Mahayuti : आगामी महापालिका निवडणुकीत अर्ज भरण्यासाठी अवघे ४ दिवस शिल्लक आहेत. परंतु जागावाटपावरून प्रत्येक राजकीय पक्षात सस्पेन्सच पाहायला मिळाला आहे. बंडखोरी टाळण्यासाठी युती आणि आघाडीच्या पक्षांनी ही रणनीती अवलंबली असल्याचे ते सांगतात. मुंबईत ठाकरे बंधू यांच्या युतीची घोषणा झाली आहे परंतु जागांचा आकडा अजून अधिकृतपणे जाहीर करण्यात आला नाही.
त्याचबरोबर भाजपा आणि शिंदेसेना हे देखील महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. शिवाय या दोन्ही पक्षांमधील जागावाटपाचा तिढा सुटल्याची देखील माहिती आहे.
मुंबईत भाजपा १४० तर शिंदेसेना ८७ जागांवर लढणार असल्याचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती आत समोर आली आहे. येत्या १५ जानेवारीला मुंबईत मतदान पार पडणार आहे. त्यात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या मॅरेथॉन बैठका सुरू असल्याचे देखील पाहायला मिळत आहे.
या दोन्ही पक्षात २०० जागांपर्यंत एकमत झालं असून अद्याप २७ जागांवर चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. ठाकरे बंधू यांच्या युतीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे देखील चित्र आहे. त्यात कुठल्याही परिस्थितीत भाजपाचा महापौर मुंबईत बसवायचा असा प्रयत्न भाजपाचा आहे. त्यामुळे महायुतीत काही नरमाईची भूमिका घेत शिंदेसेनेने काही जागांवर पाणी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्याशिवाय शिंदेसेनेवर उघडपणे टीका करू नका अशा सूचनाही भाजपा नेत्यांना दिल्या गेल्या आहेत.
दरम्यान, मुंबई महापालिकेत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. याठिकाणी नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीशी युती करण्यास भाजपा आणि शिंदेसेनेने नकार दिला असल्याचे चित्र देखील समोर आहे. मात्र अजित पवारांनी मलिकांच्या मागे ठाम असल्याचे वारंवार दाखवून दिले.
त्यामुळे मुंबईत महायुतीत भाजपा आणि शिंदेसेना एकत्रित निवडणूक लढवणार आहेत आणि अजित पवारांचा पक्ष वेगळी निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीत भाजपा १४० तर शिंदेसेनेला ८७ जागा लढवणार असल्याची माहिती आहे.









