Mahayuti Manifesto : भाजपा, शिंदे गट, रिपाइं महायुतीने आज मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आपला वचननामा ( Mahayuti Manifesto) जाहीर केला. यावेळी फडणवीस व एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंनी मराठी माणसाला मुंबईबाहेर विरारपर्यंत फेकले हे पुन्हा पुन्हा सांगत आम्ही मुंबईच्या बाहेर फेकल्या गेलेल्या मराठी माणसाला आम्ही मुंबईत परत आणू, असे आश्वासन दिले. आणखी विशेष म्हणजे महिलांना बेस्ट बस तिकिटांत 50 टक्के सवलत देणार असे आश्वासन देण्यात आले. याशिवाय मुंबईतील 29 हजार सफाई कामगारांना मुंबईत मालकीचे घर आणि लाडक्या बहिणींना उद्योगासाठी 5 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाईल या दोन महत्त्वाच्या घोषणा झाल्या. मुंबईच्या लोकल प्रवाशांसाठी लोकलचे आणखी तीन डबे वाढविण्याच्या प्रयत्नासह उपनगरी रेल्वेवर वातानुकूलित बंद दरवाजाच्या लोकलचे आश्वासन देण्यात आले.
महायुतीच्या वचननामा प्रकाशनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाइंचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले, अमित साटम, आशिष शेलार, मिलिंद देवरा आणि भाजपा-शिंदे गटाचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंच्या मुंबई पालिकेच्या जाहीरनाम्याला टोमणेनामा म्हणून टीका केली. सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्हाला मराठी भाषा जोपासायची आहे, विरार-वांगणीपर्यंत गेलेला मुंबईकर परत आणायचा आहे. याआधी पालिकेत ज्यांची सत्ता होती त्यांना जनता याबद्दल जाब विचारणारच आहे. झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी ओसी न मिळालेल्या इमारती, पागडी इमारती यांना दिलासा दिला आहे. 17 ठिकाणी क्लस्टर विकास करणार आहोत. गिरणी कामगारांना मुंबई व एमएमआरमध्ये घरे देणार आहोत. बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरा करणार आहोत. मुंबईतील महिलांना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत देणार आहोत.
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न सुटू शकतात हा विश्वास आम्ही मुंबईकरांना दिला, आमचा वचननामा पूर्ण करू आणि त्याची माहिती पाच वर्षांनी देऊ. गृहनिर्माणाच्या अनेक समस्या आम्ही सोडवल्या आहेत. आम्ही संकल्प केला आहे की, मुंबईत राहणार्या मराठी माणसांना आम्ही मुंबईतच घरे देऊ. बीडीडी चाळ, अभ्युदय नगरात आम्ही करून दाखवले. मुंबईत आता म्हाडा विकासक असेल. त्यामुळे बिल्डरकडून फसवणूक होणार नाही.
धारावीतील प्रत्येक पात्र व्यक्तीला धारावीतच 350 चौ. फुटांचे घर देणार आहोत. जे अपात्र आहेत त्यांनाही घर देणार आहोत. हे मोठे काम आम्ही केले आहे. पालिकेतील सफाई कामगारांना मुंबईत मालकी हक्काचे घर देणार, पालिका शाळेत मराठी अधिक चांगले शिकता यावे यासाठी मराठी लॅब उभारणार, आरोग्याच्या बाबतीत रुग्णालयात आणखी दोन हजार बेड निर्माण करणार आहोत. 2060 सालच्या लोकसंख्येला आवश्यक तितक्या पाण्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. सांडपाण्याचे शुद्धीकरण केले जाईल. यामुळे हे पाणी समुद्रात जाणार नाही, कचर्यापासून वीजनिर्मिती, मेट्रोचे काम 2029 पर्यंत पूर्ण करू, बेस्ट बसची संख्या वाढवून 10 हजार करणार, लोकल रेल्वेचे डबे वाढवणे, प्लॅटफॉर्मची उंची वाढवणे, उपनगरीय लोकलमध्ये वातानुकूलित डबे देणार. परंतु सेकंड क्लासचे तिकीट दर वाढवणार नाही. मुंबई व एमएमआरमध्ये 21 ठिकाणी जेट्टी उभारून जलवाहतूक वाढवणार, नवी मुंबई ते गेटवे वॉटर टॅक्सी सुरू करण्यात येतील, कुर्ला ते घाटकोपर पूल व आणखी रस्ते बांधले जातील, लाडक्या बहिणींना 5 लाख बिनव्याजी कर्ज देणार आहोत. मुंबईतील सामान्य मराठी माणूस, महिला, झोपडपट्टीवासी या सर्वांच्या गरजा आम्ही पूर्ण करणार आहोत. मुंबईकरांनी 25 वर्षांची निष्क्रियता बघितल्यानंतर पुढील 5 वर्षे आमचे काम पाहावे.
बेस्ट तोट्यात तरी महिलांना 50 टक्के सूट
आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टवर आधीच मोठे कर्ज आणि अनुदानाचा बोजा असतानाही महिलांना बेस्ट प्रवासात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा महायुतीने केली आहे. बेस्ट उपक्रमात सध्या कंत्राटी बस आणि चालक आहेत. बेस्टच्या मालकीच्या 3 हजार बसही नाहीत. बेस्ट कर्मचार्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही, निवृत्तीनंतरचा भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) अडकलेले आहेत. कंत्राटी कर्मचार्यांना तुलनेने कमी वेतन, कमी सुविधा आणि अपुरी सामाजिक सुरक्षा मिळते. बेस्टने प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक बस खरेदीचा निर्णय घेतला. मात्र, या बसची खरेदी किंमत, चार्जिंग यंत्रणा उभारणी, बॅटरी बदल आणि देखभाल खर्च अपेक्षेपेक्षा जास्त आहे आणि त्यासाठी खासगी कंपन्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे खर्च वाढला. अनेक बस डेपो जमिनींच्या पुनर्विकासाचा मुद्दा वादात आहे. सध्या बेस्टला दरवर्षी हजारो कोटी रुपयांचे महापालिकेचे अनुदान घ्यावे लागते. त्यात आणखी सवलतीचे वचन दिले आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
महाराष्ट्र दहावी–बारावी परीक्षा सुरक्षिततेसाठी नवा मार्ग; सीसीटीव्ही आणि ड्रोन नियंत्रण









