Mahesh Kothare: सुप्रसिद्ध मराठी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) यांनी भाजप (BJP) आणि पंतप्रधान मोदींवर (PM Modi) केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. कोठारे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात “भाजप म्हणजे आपले घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा आणि पंतप्रधान मोदींचा भक्त आहे,” असे विधान केले होते. या विधानाने मुंबईच्या राजकारणात खळबळ उडवून दिली.
संजय राऊत यांनी केले ‘तात्या विंचू’चे भाकीत
कोठारे यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडले. “महेश कोठारे नक्की मराठीच आहेत ना? मला शंका वाटते,” असे म्हणत राऊत यांनी टोला लगावला.
ते पुढे गंमतीत म्हणाले, “कलाकार म्हणून तुमचे सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी पाहिलेले नाहीत. तुम्ही असेच बोलत राहिले, तर तात्या विंचू रात्री येऊन तुम्हाला चावेल आणि तुमचा गळाही दाबेल.”
महेश कोठारेंचा हसत हसत पलटवार
संजय राऊत यांच्या ‘तात्या विंचू’ टीकेनंतर महेश कोठारे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. कोठारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वाद घालणे पूर्णपणे टाळले. उलट, त्यांनी हसून आणि शांतपणे आपली बाजू मांडली.
“हे माझं प्रामाणिक आणि खरं मत आहे. मी एक नागरिक म्हणून हे व्यक्त केले आहे आणि मला व्यक्तीस्वातंत्र्य आहे.संजय राऊतांनी माझ्याविषयी जी टिप्पणी केली, त्याला माझी हरकत नाही. ते त्यांचे मत होते आणि मी त्यांचा आदर करतो.”, असे ते म्हणाले.
‘माझं मत निर्विवाद आहे. मी जे म्हटलं, ते मनापासून म्हटलं आहे आणि मी माझ्या मतावर ठाम आहे,” असे स्पष्टीकरण कोठारे यांनी हसत हसत दिले.
कोठारे यांनी नेमके काय विधान केले होते?
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मागाठाणे परिसरात आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात महेश कोठारे सहभागी झाले होते. याच वेळी त्यांनी, “पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत मुंबईवर कमळ फुललेले असेल. आपल्याला फक्त नगरसेवक नाही, तर उद्या या विभागातून मुंबईचा महापौर निवडला जाईल,” असे मोठे विधान केले होते. त्यांचे हे विधान सोशल मीडियावरचांगलेच व्हायरल झाले होते.
हे देखील वाचा – Mahesh Kothare: ‘भाजप म्हणजे आपलं घर; मी मोदींचा…’; महेश कोठारेंचे वक्तव्य चर्चेत