Mumbai Local Incident: काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलच्या महिला डब्यात बुर्खा घालून एक पुरुष शिरल्याची घटना समोर आली होती. आता त्या संशयास्पद व्यक्तीच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी (GRP) तांत्रिक तपासाच्या जोरावर या ५७ वर्षीय आरोपीला नाशिकमधून ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना आणि आरोपीचा बनाव
ही घटना ६ फेब्रुवारी रोजी कर्जत लोकलमध्ये घडली होती. एका ५७ वर्षीय व्यक्तीने स्वतःची ओळख लपवण्यासाठी बुर्खा परिधान केला आणि तो महिलांसाठी आरक्षित असलेल्या द्वितीय श्रेणीच्या डब्यात शिरला. मात्र, डब्यातील महिलांना त्याच्या हालचालींवरून संशय आला. त्याचे पितळ उघडे पडताच, घाटकोपर स्थानकात त्याने प्लॅटफॉर्मच्या विरुद्ध दिशेला रेल्वे रुळांवर उडी मारून फरार झाला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिला गेला होता.
अशी झाली अटक
आरोपी पसार झाल्यापासून रेल्वे पोलीस त्याच्या शोधात होते. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी घाटकोपर आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा कसून तपास केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले, ज्यावरून आरोपी नाशिकमध्ये असल्याची पुष्टी झाली. पोलिसांनी सापळा रचून अल्ताफ हुसैन शेख याला नाशिकमधून अटक केली.
तपासात धक्कादायक माहिती समोर
प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, अटक करण्यात आलेला अल्ताफ शेख हा गेल्या ३ वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. मात्र, रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्याच्यावर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
महिला सुरक्षेबाबत रेल्वेचे कडक पाऊल
या अटकेनंतर रेल्वे प्रशासनाने पुरुष प्रवाशांना पुन्हा एकदा इशारा दिला आहे. केवळ मानसिक आजाराचे कारण पुढे करून महिलांच्या डब्यात शिरणाऱ्यांवर दया दाखवली जाणार नाही. रेल्वे कायद्याच्या विविध कलमांनुसार अशा कृत्यासाठी कडक शिक्षा आणि दंडाची तरतूद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.













