Manikrao Kokate: महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ‘पीक विम्यासाठी सरकार शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, याचा अर्थ शासन भिकारी आहे, शेतकरी नाही,’ असे वक्तव्य त्यांनी केले.
त्यांच्या या विधानामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर नाराजी व्यक्त केली आहे.
कोकाटेंचे वादग्रस्त विधान आणि स्पष्टीकरण
विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री कोकाटे (Manikrao Kokate Statement) यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. याच पत्रकार परिषदेत त्यांनी पीक विम्याबाबत बोलताना हे नवीन वादग्रस्त विधान केले. “शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, पण शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. मग भिकारी कोण? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही,” असे ते म्हणाले.
यापूर्वी काही महिन्यांपूर्वीही त्यांनी पीक विमा योजनेवरून शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केले होते, ‘भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आणि आम्ही एक रुपयात पीक विमा देतो. त्याचा लोकांनी गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला’. याच वक्तव्याबाबत आजच्या पत्रकार परिषदेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
“शेतकऱ्यांना मी यापूर्वी कधीही भिकारी म्हणालो नव्हतो. तेव्हाही माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेला होता. शेतकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते, म्हणजे भिकारी शासन आहे, शेतकरी नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले. मात्र, त्यांच्या या नव्या वक्तव्यावरून विरोधकांनी पुन्हा एकदा टीका केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
कृषिमंत्री कोकाटे यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत नाराजी व्यक्त केली. “कोकाटे काय बोलले, हे मी पाहिले नाही; पण मंत्र्यांचे असे वक्तव्य दुर्दैवी आहे. कोणत्याही मंत्र्याने असे बोलणे चुकीचे आहे,” असे फडणवीस म्हणाले.
पीकविम्याबाबत चुकीची माहिती पसरली असून, जुनी पद्धत शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांना जास्त फायदेशीर होती, त्यामुळे त्यात सुधारणा केल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, कृषी क्षेत्रात दरवर्षी 5 हजार कोटी, म्हणजेच पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी नमूद केले.