Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. 27 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून निघालेले जरांगे-पाटील 29 ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करणार आहेत. ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
या आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होऊ नये यासाठी, जरांगे-पाटील यांनी मुंबई पोलिसांना (Mumbai Police) त्यांच्या स्वाक्षरीने एक सविस्तर हमीपत्र (undertaking) सादर केले आहे.
या हमीपत्रात त्यांनी 20 मुद्द्यांवर पोलिसांना शांततापूर्ण आंदोलनाचे आश्वासन दिले आहे. मुंबई पोलिसांनी काही अटी व शर्तींसह या आंदोलनाला परवानगी दिली आहे.
परवानगीनुसार, हे आंदोलन केवळ 29 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत आझाद मैदानावर होईल आणि त्यात केवळ 5,000 आंदोलकांना सहभागी होण्याची मुभा असेल.
मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या हमीपत्रातील सर्व 20 आश्वासने खालीलप्रमाणे:
- कर्तव्यावर असलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याने परवानगीची मागणी केल्यास, त्याची मूळ प्रत सोबत बाळगेल.
- पोलिसांच्या संपर्कासाठी पांडुरंग मारक या जबाबदार व्यक्तीची नियुक्ती करेल.
- नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सल्ल्यानुसार पिण्याचे पाणी (टँकरद्वारे) आणि प्रथमोपचार/वैद्यकीय मदतीची व्यवस्था करेल.
- आंदोलन सुव्यवस्थित रीतीने होईल आणि वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची खात्री करेल. तसेच, वाहतूक नियमांचे पालन केले जाईल.
- आंदोलकांचे संख्या मर्यादेपेक्षा वाढणार नाही याची खात्री करेल.
- पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पुरेसे स्वयंसेवक नेमले जातील आणि त्यांची यादी पोलिसांना दिली जाईल.
- आंदोलन केवळ विहित ठिकाणीच (आझाद मैदान) आयोजित केले जाईल.
- आंदोलन सकाळी 9:30 ते सायंकाळी 5:30 या ठरवलेल्या वेळेतच होईल.
- ध्वजांसाठी/फलकांसाठी 2 फुटांपेक्षा अधिक लांबीची काठी वापरणार नाही. ध्वजाचा/फलकाचा आकार 9 फूट 6 फूट किंवा त्यापेक्षा कमी असेल.
- आंदोलक लाठ्या, अग्निशस्त्रे, तलवारी यांसारखी कोणतीही प्राणघातक शस्त्रे बाळगणार नाहीत.
- कोणत्याही चिथावणीखोर किंवा धार्मिक तेढ निर्माण करणारे भाषण करणार नाही.
- मुंबई पोलीस आयुक्तांच्या किंवा इतर कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या सर्व कायदेशीर सूचनांचे तात्काळ पालन करेल.
- आंदोलनात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही किंवा शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला होणार नाही याची खात्री करेल.
- कोणत्याही प्रार्थनास्थळाचा किंवा पवित्र वस्तूचा अपमान केला जाणार नाही.
- विहित ठिकाणावरून कूच करणार नाही आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करेल.
- कोणतीही कागदपत्रे, पुस्तके, प्रतिमा जाळणार नाही किंवा कचरा करणार नाही.
- परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक किंवा जनसंबोधन यंत्रणेचा वापर करणार नाही.
- ट्रॅक्टर, बैलगाडी, रिक्षा किंवा घोडे, हत्ती यांसारखे प्राणी आंदोलनस्थळी आणले जाणार नाहीत.
- अनुयायांना नियंत्रणात ठेवण्यास स्वतः जबाबदार राहील आणि अपयश आल्यास खटला दाखल करण्यास तयार असेल.
- हमीपत्रातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करेल आणि पोलिसांना सर्व परिस्थितीत सहकार्य करेल.
ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा
हे देखील वाचा –
Ganeshotsav 2025 : रील बनवा आणि 1 लाखांपर्यंतचे रोख बक्षीस जिंका; महाराष्ट्र सरकारची अनोखी स्पर्धा
1 सप्टेंबरपासून लागू होणार 5 मोठे बदल; तुमच्या बजेटवर थेट परिणाम होण्याची शक्यता