Home / महाराष्ट्र / Manoj Jarange Patil : “मराठ्यांना मोठे केले म्हणूनच माझ्या ‘सुपाऱ्या’ दिल्या जात आहेत”; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange Patil : “मराठ्यांना मोठे केले म्हणूनच माझ्या ‘सुपाऱ्या’ दिल्या जात आहेत”; मनोज जरांगे पाटील यांचा खळबळजनक आरोप

Manoj Jarange Patil : “मी मराठा समाजाच्या हक्कासाठी लढलो आणि समाजाला संघटित करून मोठे केले, हाच गुन्हा मानून आता माझ्या...

By: Team Navakal
Manoj Jarange Patil
Social + WhatsApp CTA

Manoj Jarange Patil : “मी मराठा समाजाच्या हक्कासाठी लढलो आणि समाजाला संघटित करून मोठे केले, हाच गुन्हा मानून आता माझ्या विरोधात कारस्थान रचले जात आहे. माझ्या जीवाचे बरे-वाईट करण्यासाठी सुपाऱ्या दिल्या जात आहेत,” असा खळबळजनक आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे आयोजित शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत संघर्षाचा निर्धार-
मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवेढा परिसराचा दौरा केला. यावेळी शिवजयंतीच्या औचित्याने आयोजित जाहीर सभेत त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली. मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळत असताना, हा लढा कमकुवत करण्यासाठी पडद्यामागून काही शक्ती सक्रिय झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. “समाजाच्या एकजुटीला तडा जाण्यासाठी आणि माझा आवाज दाबण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत, मात्र मी अशा धमक्यांना घाबरणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

“राजकारण केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित ठेवा, मुलाबाळांना उच्च पदस्थ अधिकारी करा”; मनोज जरांगे पाटील यांचे समाजाला भावनिक आवाहन-
“मराठा आरक्षणाची लढाई ही केवळ हक्कासाठी नसून ती आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या भविष्यासाठी आहे. त्यामुळे समाजाने राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच करावे. निवडणूक संपली की सर्व हेवेदावे विसरून पुन्हा आपल्या शेतात घाम गाळावा आणि आपल्या मुलाबाळांना उच्च शिक्षित करून मोठे अधिकारी करावे,” असे कळकळीचे आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

स्वकीयांच्या विरोधावर मर्माहत भाष्य
मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी आपल्याच लोकांमधील फितुरीवर खेद व्यक्त केला. ते म्हणाले की, “दुर्दैवाने आपल्याच काही लोकांना हाताशी धरून माझ्या विरोधात बोलण्यास भाग पाडले जात आहे. षडयंत्र रचून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काही शक्ती करत आहेत. मात्र, जोपर्यंत मायबाप जनतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, तोपर्यंत मला काहीही होणार नाही. जनताच माझे खरे कवच आहे.”

आरक्षण न मिळाल्यास तीव्र संघर्षाचा इशारा
आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला पुन्हा एकदा इशारा देताना ते म्हणाले की, “मराठा समाज शांत आहे, याचा अर्थ तो हतबल आहे असा नाही. जर सरकारने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे आरक्षण दिले नाही, तर भविष्यात होणाऱ्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल. वेळ पडल्यास आम्ही कोणाचीही गय करणार नाही आणि एका एकाला पाहून घेऊ.”

प्रशासकीय सत्तेचे महत्त्व आणि शिक्षण
समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी शिक्षणावर विशेष भर दिला. “आपली मुले जर मोठी अधिकारी झाली, तर समाजाची पुढील ५० वर्षांची चिंता मिटेल. एखाद्या कामासाठी किंवा केवळ सही घेण्यासाठी आपल्याला कोणाच्या तरी दारासमोर ताटकळत उभे राहावे लागणार नाही. प्रशासनात आपली माणसे असणे, हीच काळाची गरज आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“पश्चिम महाराष्ट्रात ‘सातारा गॅझेटिअर’ लागू करा, अन्यथा थेट मंत्रिमंडळ बैठकीत आंदोलन”; मनोज जरांगे पाटील यांचा नवा पवित्रा-
मराठा आरक्षणाचा लढा आता पश्चिम महाराष्ट्रात अधिक तीव्र करण्याचे संकेत मनोज जरांगे पाटील यांनी दिले आहेत. सातारा, मिरज आणि कोल्हापूर या संस्थानांची ऐतिहासिक गॅझेटिअर (राजपत्रे) तातडीने लागू करावीत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. विशेषतः सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये मराठा समाजाच्या लाखो नोंदी असल्याचा दावा करत, सरकारने ही मागणी मान्य न केल्यास थेट राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

गॅझेटिअरमधील १५ लाख नोंदी आणि ४२ लाखांना लाभ-
मनोज जरांगे पाटील यांनी ऐतिहासिक पुराव्यांचा आधार घेत सांगितले की, “सातारा संस्थानच्या गॅझेटिअरमध्ये सुमारे १५ लाख मोडी व अन्य ऐतिहासिक नोंदी उपलब्ध आहेत. जर सरकारने ही गॅझेटिअर अधिकृतपणे लागू केली, तर पश्चिम महाराष्ट्रातील सुमारे ४२ लाख मराठा बांधवांना आरक्षणाचा थेट लाभ मिळू शकतो.” या नोंदींमुळे कुणबी प्रमाणपत्रांचा मार्ग सुकर होणार असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील लढा या मुद्द्यावर केंद्रित करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

पुढील महिन्यापासून सोलापुरातून रणशिंग-
या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आणि समाजजागृती करण्यासाठी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात विशेष बैठकांचे सत्र सुरू करणार आहेत. याची पहिली बैठक पुढील महिन्यात सोलापूर येथे पार पडणार आहे. “मी स्वतः या बैठकांसाठी मैदानात उतरणार आहे. सरकारने त्यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करून समाजाला न्याय द्यावा, अन्यथा आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘सारथी’ आणि ‘अण्णासाहेब पाटील महामंडळा’साठी संघर्षाची तयारी-
मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सारथी’ संस्था आणि ‘अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा’च्या सद्यस्थितीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या संस्थांना मिळणारा निधी आणि त्यांच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मोठ्या आंदोलनाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. “केवळ महामंडळे स्थापन करून चालणार नाही, तर त्यांचा लाभ तळागाळातील मराठा तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी आम्हाला पुन्हा एकदा संघर्ष करावा लागेल,” असे संकेत त्यांनी दिले.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या