अहिल्यानगर – पुण्यातील (Pune) वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagwane) आत्महत्या प्रकरणानंतर मराठा (maratha) समाजाच्या वतीने दोन महिन्यांपूर्वी लग्नासाठीची (Marriage) आचारसंहिता घालून दिली होती. त्यानंतर मराठा समाजाच्या वतीने आज अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) लग्नाच्या आचारसंहितेचा प्रचार- प्रसार व्हावा आणि ती समाजात रुजवावी यासाठी मराठा लग्न आचारसंहिता संमेलन भरवण्यात आले.
या संमेलनाला हभप भास्करगिरी महाराज, हभप जंगले महाराज शास्त्री, पद्मश्री पोपटराव पवार ,आमदार संग्राम जगताप, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे उपस्थित होते. संमेलनात विवाहाच्या आचारसंहितेचा निर्धार करण्यात आला असून हुंडा, प्री-वेडिंग, डीजे, खर्च नको यासंबंधीचे मुद्दे मांडण्यात आले.
या आचारसंहितेनुसार, लग्नात हुंडा देणे-घेणे पूर्णतः टाळावे , हुंड्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव करावी, प्री-वेडिंगचा (Pre-wedding) व्हिडिओ जर लग्नात दाखवला तर उठून जावे, डीजे (DJ) ऐवजी पारंपारिक वाद्य वापरावी , लग्न सोहळा १०० ते २०० लोकांमध्ये करावा, कर्ज काढून लग्नात खर्च करू नये, हार घालताना नवरा नवरीला उचलू नका, लग्नात फक्त वधूपिता आणि वर पिता यांनीच फेटे बांधावेत, पाहुण्यांचे फेटे आणि इतर सत्कार बंद करावे, लग्न, वाढदिवस, उद्घाटन कार्यक्रमात पुस्तके, झाडाची रोपे किंवा रोख स्वरूपात आहेर करावे, लग्नात प्रमुख व्यक्तीच्या हस्ते सोन्याचे दागिने, गाडीच्या चाव्या, वस्तू देऊ नये असे आवाहन करण्यात आले.