शिवसेना शिंदे गटाच्या शाखेत बाराखडीची पुस्तके मिळणार

pratap sarnaik

भाईंदर – सध्या मीरा- भाईंदरमध्ये धुमसत असलेल्या हिंदी- मराठी वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आपल्या पक्षाच्या शाखांमध्ये मराठी बाराखडीची पुस्तके ठेवणार आहे. अमराठी नागरिकांना मराठी भाषा सोप्या पद्धतीने शिकता यावी यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा उपक्रम राबविण्याची घोषणा केली आहे.

मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की,या उपक्रमाच्या माध्यमातून कोणावरही जबरदस्ती न करता प्रेमाने मराठी शिकवण्यात येईल. मी चार वेळा मीरा- भाईंदरमधून मराठी आमदार म्हणून निवडून आलो आहे. मला विविध भाषिकांनी मत दिले आहे. त्यामुळे सर्व भाषांचा सन्मान महत्वाचा आहे. पण महाराष्ट्रात रहायचे तर मराठी येणे आवश्यकच आहे. ती जबरदस्तीने नव्हे तर आत्मियतेने शिकवायची आहे. म्हणून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये बाराखडीसह मराठी भाषेबाबत संपूर्ण माहिती देणारी पुस्तके उपलब्ध करून दिली जातील. या उपक्रमामुळे भाषेवरून निर्माण होणारा द्वेष कमी होऊन विविध प्रांतांतून आलेल्या नागरिकांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण होईल, असा विश्वास परिवहन मंत्री शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.