Home / महाराष्ट्र / Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पूरस्थितीमुळे जनजीवनविस्कळीत! अनेक गावांचा संपर्क तुटला

Marathwada Heavy Rain: मराठवाड्यात पूरस्थितीमुळे जनजीवनविस्कळीत! अनेक गावांचा संपर्क तुटला

Marathwada Rain

Marathwada Heavy Rain- मराठवाड्यात (Marathwada Heavy Rain)गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाने पुन्हा कहर केला. यामध्ये नांदेड (Nanded), लातूर (Latur) आणि बीड (Beed) जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. अनेक रस्ते पाण्याखाली गेले. शेतांमध्ये पाणी शिरल्याने शेतीचेही प्रचंड नुकसान झाले. प्रशासन दक्ष असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरू आहे.

नांदेड जिल्ह्यात काल सायंकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मुखेड, कंधार व नायगाव तालुक्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले. मुखेड तालुक्यातील चांडोळा, येवती, जांब, बाऱ्हाळी, मुक्रमाबाद, अंबुलगा आणि जाहुर यांसह आठ गावांना पावसाचा जबरदस्त फटका बसला. हसनाळ व रावणगाव ही बुडीत क्षेत्रातील गावे पुन्हा पाण्याखाली गेली. कंधार तालुक्यातील हाळदा, भूकमारी, चौकी महाकाय, लाडका, गोणार, देवईचीवाडी, गुंडा, जाकापूर, चिखली अशा २० गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. लाडका, मानसिंगवाडी, रुई व मोहिदा परांडा या गावांचा संपर्क तुटला.

उर्ध्व मन्यार प्रकल्प धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे त्यातील अतिरिक्त पाणी सोडले. सध्या ७ दरवाजे उघडले आहेत. कंधारचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी नागरिकांना दक्षतेचा इशारा दिला आहे. नायगाव तालुक्यातील नरसी येथे ११५ मिमी पावसाची नोंद झाली. नरसी – बिलोली मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आणि अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे काल रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वाण नदीला पूर आला. त्यामध्ये धारूर-आसरडोह आणि धारूर-आडस मार्गावरील पूल पाण्याखाली गेले. या पाण्यात चारचाकी व रिक्षा वाहून गेल्याने नितीन कांबळे (४२) यांचा मृत्यू झाला. तर अनिल लोखंडे (२६) हा युवक अद्याप बेपत्ता आहे.

लातूर जिल्ह्याच्या सीमेवरील धडकनाळ व बोरगाव परिसरात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली. लेंडी नदीच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे परिसरातील शेती व घरे पाण्याखाली गेली. यापूर्वीच्या पुरानंतर केलेल्या पुलाची डागडुजी निष्फळ ठरली. पुन्हा आलेल्या पुरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली. मागील २४ तासात लातूर जिल्ह्यात १०० मिमी पावसाची नोंद झाली. मांजरा, रेणा, तेरणा व तावरजा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.


ताज्या  बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

विरारमध्ये इमारत कोसळली! १७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरण ! अरुण गवळीला सुप्रीम कोर्टात जामीन

शाहरुख खान-दीपिका पादुकोणसह हुंडई कंपनीच्या सहा जणांवर गुन्हा