Marvel Superheroes in Maharashtra Elections : महानगरपालिका निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून अनेक महानगरपालिकांमध्ये महायुतीला मोठे यश पाहायला मिळाले. मात्र, या निवडणुकीत केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपच नाही, तर प्रचारासाठी वापरण्यात आलेले एक अनोखे तंत्र सर्वांचे लक्ष वेधून घेणारे ठरले.
सोशल मीडियावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून बनवलेले मार्व्हल सुपरहिरोजचे व्हिडिओ प्रचाराचे मुख्य साधन बनले होते.
सुपरहिरोजचा राजकीय अवतार
या निवडणुकीत एआयच्या मदतीने आयर्न मॅन, कॅप्टन अमेरिका आणि हल्क यांसारख्या पात्रांना विविध राजकीय पक्षांचे उमेदवार म्हणून दाखवण्यात आले:
- भाजप आणि आयर्न मॅन: रेड-गोल्ड आर्मरमध्ये असलेला आयर्न मॅन भाजपचा उमेदवार म्हणून दाखवण्यात आला. तो मुलांना व्हिडिओ गेम्स आणि मुलींना हेअर ड्रायर देण्याचे मजेशीर आश्वासन देताना दिसला.
- मनसेचा कॅप्टन अमेरिका: कॅप्टन अमेरिका चक्क मनसेचा झेंडा घेऊन उभा असलेला पाहायला मिळाला.
- शिवसेनेचा हल्क: अनेक व्हिडिओंमध्ये हल्कला शिवसेनेचा उमेदवार म्हणून रंगवण्यात आले होते.
- थानोसचा काँग्रेस अवतार: दुसरीकडे, थानोस हा पांढरा कुर्ता आणि तिरंगी उपरणं घालून काँग्रेसचा प्रचार करताना दिसला.
‘वडापाव’ डिप्लोमसी आणि व्हायरल ट्रेंड
प्रचाराच्या या धुमाळीत एका प्रसिद्ध फूड चेनने तर या सर्व हिरोंना एकत्र आणले. राजकीय मतभेद बाजूला सारून थानोस आणि आयर्न मॅन एकत्र बसून वडापाव खातानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. “या वडापावसाठी मी जगाचा विनाश करणार नाही,” असे थानोस या व्हिडिओत म्हणताना दिसला.
कॉपीराइटचा बडगा आणि ‘हल्क’चा शेवट
या रंजक प्रचारावर आता मार्व्हल कंपनीने आक्षेप घेतला आहे. गुगल एआयने ‘हल्क’ या शब्दावरून व्हिडिओ तयार करण्यावर बंदी घातली आहे. एका एआय पेजने तर ‘हल्कु भाई’चा मृत्यू झाल्याचे चित्र पोस्ट करून मार्व्हलच्या या कारवाईचा निषेध केला आहे. निवडणुका संपल्या असल्या तरी, एआयने तयार केलेले हे सुपरहिरोजचे राजकीय व्हिडिओ आजही सोशल मीडियावर चर्चेत आहेत.









