
Mayor of Mumbai-Pune - मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडली असून भाजपा व शिंदेसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची गटनोंदणी झाली नसल्याचे निमित्त पुढे करण्यात आले. प्रत्यक्षात शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात अजूनही महापौर पदासह समिती वाटपावर एकमत झालेले नाही. दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांवर ठाम असल्याने पेच सुटताना दिसत नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक आता फेब्रुवारी महिन्यातच होण्याची चिन्हे आहेत.पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 27 जानेवारी रोजी महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार होते. 31 जानेवारीच्या महापौर निवडीची जाहिरात देण्याची तयारीही प्रशासनाने केली होती. मात्र, काल रात्री उशिरा हा संपूर्ण कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक लांबणीवर पडण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे भाजपा आणि शिंदेसेनेच्या नगरसेवकांची अद्याप गटनोंदणी प्रक्रियाच झालेली नाही. भाजपा आणि शिवसेना युतीची एकत्रित गट नोंदणी होणार की वेगवेगळी, हे अजून ठरवण्यात आलेले नाही. ही नोंदणी एकत्र होणार असेल तर यासंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये काहीही बोलणी अजून तरी झालेली नाही. दोन्ही पक्षांनी याबाबत मौन धारण केलेले आहे. भाजपा आणि शिंदेसेना या दोन्ही पक्षांनी महापौरपदावर दावा केला आहे. परंतु 89 जागा जिंकणारा भाजपा महापौरपद शिंदे सेनेसाठी सोडण्याची शक्यता जवळजवळ शून्य आहे. भाजपाला मिळाले तर स्थायी समिती अध्यक्षपद तरी आपल्याला मिळावे, अशी शिंदेसेनेची अपेक्षा आहे. यावर दोन्ही पक्षांतील चर्चा होऊन वाद मिटल्याशिवाय आणि अंतिम निर्णय झाल्याशिवाय एकत्र गटनोंदणी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे या गटनोंदणीला आणखी काही दिवस लागू शकतात. त्यानंतरच महापौर निवड प्रक्रियेला गती मिळेल.
दोन्ही पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांची काल रात्री बैठकही झाली. या बैठकीत कोणताही ठाम निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे येणार्या काही दिवसांत मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापनेचा पेच दिल्लीत तिन्ही पक्षांच्या नेत्यांना बोलावून भाजपा पक्षश्रेष्ठी सोडवतील अशी अपेक्षा आहे. याशिवाय भाजपाला महापौरपदाचा चेहरा निवडतानाही कसरत करावी लागत आहे. कारण पक्षात इच्छुकांची गर्दी मोठी असून नाव निश्चित करताना अनेकांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे.
पुण्यातही महापौर निवड फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली आहे. पालिकेने विभागीय आयुक्तांना पत्र लिहिल्यानंतर 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता महापौर व उपमहापौर निवड आणि त्यानंतर सर्वसाधारण सभा होणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मुंबईच्या महपौरपदाच्या निवडीला होणार्या विलंबाबद्दल प्रतिक्रिया देताना उबाठा खा. संजय राऊत म्हणाले की, शिंदेंची सेना आणि भाजपाची गटस्थापना झाली नाही. गटस्थापना बहुतेक घटस्थापनेपर्यंत होईल. एकनाथ शिंदे आणि भाजपचे काही जुळत नाही. तिकडे शिंदे रुसून बसलेत. रुसून बसलेली सूनबाई सारख्या दिल्लीत फेर्या मारते आहे. पण दिल्लीचे सासरे सूनबाईंचे काही ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे नववधूची अडचण झाली आहे. करे तो क्या करे? असा इज्जत का सवाल आहे.ते बोलून गेलेत की आमचा महापौर होणार. पण भाजपाची एक भूमिका असते की माझे ते माझे, तुझे ते माझ्या बापाचे. त्यामुळेच आम्ही त्यांच्यापासून दूर गेलो.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
पेंग्विन, ट्रम्प आणि ग्रीनलँड; मीम होतय व्हायरल..
पुण्यातील मार्केट यार्डमध्ये हापूसची पहिली आवक; हापूस आंब्याची पेटी १५ हजाराला विकली









