MHADA Mumbai Lottery: मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (MHADA) मुंबई मंडळासाठी 2640 घरांची मेगा सोडत जाहीर केली आहे. गोरेगाव, विक्रोळी, बोरीवली, चेंबूर ते दादर आणि वांद्रे अशा मुंबईतील मोक्याच्या ठिकाणच्या घरांचा यात समावेश आहे. आज, 30 मार्च 2026 रोजी दुपारी 3.00 वाजेपासून या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू होत आहे.
उत्पन्न गटानुसार घरांची उपलब्धता:
या सोडतीमध्ये प्रत्येक आर्थिक स्तरातील नागरिकांचा विचार करण्यात आला आहे:
- अत्यल्प उत्पन्न गट: 145 सदनिका
- अल्प उत्पन्न गट: 858 सदनिका
- मध्यम उत्पन्न गट: 1408 सदनिका
- उच्च उत्पन्न गट: 229 सदनिका
सोडतीचे महत्त्वाचे वेळापत्रक:
- अर्ज नोंदणी प्रारंभ: 30 मार्च 2026 (दुपारी 3.00 वाजेपासून)
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 29 एप्रिल 2026 (रात्री 11.59 पर्यंत)
- अनामत रक्कम भरण्याची मुदत: 30 एप्रिल 2026
- पात्र अर्जांची अंतिम यादी: 12 मे 2026
- सोडतीचा निकाल (Lucky Draw): 15 मे 2026 (सकाळी 11.00 वाजता)
अर्ज प्रक्रिया आणि पात्रता:
इच्छुक अर्जदार म्हाडाच्या Mhada Housing Lottery System (IHLMS 2.0) या मोबाईल ॲपद्वारे किंवा अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड आणि पॅन कार्ड.
- महाराष्ट्र राज्याचा किमान 15 वर्षांचा रहिवासी असल्याचा दाखला (Domicile Certificate).
- उत्पन्नाचा पुरावा: आर्थिक वर्ष 2024-2025 चे आयकर विवरण पत्र (ITR) किंवा तहसीलदाराचा दाखला.
उत्पन्न मर्यादा:
- अत्यल्प: वार्षिक 6 लाखांपर्यंत.
- अल्प: वार्षिक 9 लाखांपर्यंत.
- मध्यम: वार्षिक 12 लाखांपर्यंत.
- उच्च: 12 लाखांहून अधिक (कमाल मर्यादा नाही).
सावधान! एजंटपासून दूर राहा
म्हाडाने स्पष्ट केले आहे की, घरांच्या वितरणासाठी कोणत्याही खाजगी एजंट किंवा सल्लागाराची नेमणूक केलेली नाही. संपूर्ण प्रक्रिया संगणकीय आणि पारदर्शक आहे. त्यामुळे कोणाही त्रयस्थ व्यक्तीला पैसे देऊन फसवणूक करून घेऊ नका, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.










