‘पहलगाम हल्ल्यावेळी उद्धव ठाकरे युरोपमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होते’, मिलिंद देवरांची जोरदार टीका

Milind Deora on Uddhav Thackeray | जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी देखील यावर तीव्र प्रतिक्रिया दिली. आता या हल्ल्याच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे यूरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते, असा दावा करत शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी टीका केली.

पहलगाम हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरेआपल्या कुटुंबासोबत युरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते, असा आरोप करत मिलिंद देवरा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

मिलिंद देवरा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “भूमिपुत्रांपासून ते भारतातील पर्यटक… ठाकरेंची किती घसरण झाली आहे. पहलगाममध्ये गोळ्यांचा वर्षाव होत असताना, ते युरोपमध्ये सुट्टीचा आनंद घेत होते.”

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्र दिनी ते एक शब्दही न बोलता गायब झाले. कोणतंही निवेदन नाही, कोणतीही सहानुभूती नाही, कोणतीही लाज नाही.”  

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांनी पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी घटनास्थळी जाऊन काम केले.”

उद्धव ठाकरे व शिवसेनेवर (ठाकरे गट) निशाणा साधत ते म्हणाले की, “ते फक्त सोशल मीडियावर पोस्ट करत होते. सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत शिवसेना (UBT) चा एकही सदस्य उपस्थित नव्हता. काही दिवसांनंतर, १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा झाल. त्याबद्दलही त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही टाकली नाही.”

दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र स्थापना दिन (Maharashtra Foundation Day) साजरा केला जातो. उद्धव ठाकरे यांच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमातील अनुपस्थितीमुळे सत्ताधारी महायुती (Mahayuti Alliance) आघाडीतील नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.

देवरा म्हणाले, “आज संपूर्ण महाराष्ट्र आणि इथल्या जनतेला विश्वास आहे की, बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची परंपरा पुढे नेणारा जर कोणी नेता असेल, तर ते एकनाथ शिंदे आहेत. महाराष्ट्रात असे लग्झरी राजकारण चालणार नाही.”