सोलापूर- संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवार १३ जुलैला शाईफेक करत हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी प्रवीण गायकवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, इतर काही संघटनांना बंदोबस्त करावा असे सांगितल्यानंतरच माझ्यावर हल्ला करण्यात आला, असा दावा केला. तसेच यामागे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे. दीपक काटे या गुन्हेगाराला भाजपा पाठीशी घालत आहे असा आरोपही केला.
प्रवीण गायकवाड म्हणाले की, अक्कलकोट येथे जन्मेजयराजे भोसले यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशातील असल्याने त्यांचा सामाजिक कार्याबद्दल सन्मान व्हावा, ही मराठा समाजाची इच्छा होती. या कार्यक्रमात संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी उपस्थित राहिलो होतो. परंतु, समारंभानंतर अचानक काही लोकांनी माझ्यावर विषारी वंगण व तेल टाकून हल्ला केला. हल्ला करणारा दीपक काटे हा एक गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खून, अवैध शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तरीही भाजपाने त्याला युवा मोर्चाचे सरचिटणीसपद दिले आहे. भाजपाच्या पाठबळामुळेच त्याचे मनोबल वाढले आहे. यामागे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हात आहे. ज्या आरोपीला मोका लावणे गरजेचे आहे त्याला मुक्त सोडले गेले. मुक्त सोडल्यानंतर त्याने गंभीर स्वरुपाचा गुन्हा केला मी हल्ल्यानंतर तिथे चार ते पाच तास होतो, परंतु कोणत्याही आयोजकाने हल्ल्याचा निषेध केला नाही, पोलिसांत तक्रार दिली नाही. उलट भाजपाच्या लोकांनी हल्ल्याचा व्हिडीओ काढून व्हायरल केला. समाजासाठी लढणाऱ्या संघटनांना संपवण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. आम्ही या हल्ल्याचा कायदेशीर आणि सामाजिक पातळीवर तीव्र निषेध करतो. पोलिसांनी या घटनेचा गांभीर्याने तपास करावा.
त्यांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, प्रवीण गायकवाड यांच्या हल्ल्याचा मी निषेध करतो. दीड अडीच वर्षांपूर्वी दीपक काटेच्या पक्ष प्रवेशाला मी गेलो होतो, त्यावेळी मी बोललो होतो की, हा चांगला काम करेल. आम्ही सर्व लोक त्याच्या पाठिशी आहोत हे खरे असले तरी त्याने हल्ला करणे याला आपली संस्कृती साथ देत नाही. महाराष्ट्राच्या कोणत्याही आमदाराचे याला समर्थन नाही. पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.