पुणे – लाडकी बहीण योजनेमुळे (Ladki Bahin Yojana) राज्यातील इतर विकास योजनांना निधी मिळण्यात विलंब होत आहे, असे वक्तव्य राज्याचे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatreya Bharane) यांनी केले. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजनांवर परिणाम झाल्याचे भरणे यांनी यापूर्वीही म्हटले होते. त्यांनी पुन्हा याचा उल्लेख केल्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
इंदापूर तालुक्यातील घरकुल योजनेच्या धनादेश वितरण कार्यक्रमात बोलत असताना भरणे म्हणाले की, मी कुठेही असलो तरी इंदापूरसाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र लाडकी बहीण योजनेमुळे सध्या निधी वितरणात उशीर झाला आहे. आता परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. इतर जिल्ह्यांना निधी कमी मिळतो, मग इंदापूरलाच जास्त कसा मिळतो, असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. म्हणूनच मी जाहीर प्रसिद्धी करत नाही. व्हिडीओ किंवा शो करत नाही. विरोधक व्हॉट्सअॅपवर काय टाकतात, याने मला फरक पडत नाही. इंदापूरची जनता अतिशय समजूतदार आहे.