Kalyan-Dombivli – राज्यात नुकतीच पार पडलेली महापालिका निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंंधूंनी तब्बल वीस वर्षांनी एकत्र येत लढवली. एकत्र राहाण्यासाठीच एकत्र आलोत, असे प्रत्येक सभेत ठाकरे बंधूंनी ठासून सांगितले. मात्र निवडणुकीचे निकाल लागताच कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan-Dombivli )मनसेने सत्तास्थापनेसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदेसेनेने मनसेला सोबत घेण्याची खेळी खेळली आहे. मात्र शिंदे-मनसे एकत्र आल्याने मोठा धक्का उबाठाला बसला. हा निर्णय स्थानिक पातळीवर झाल्याचे मनसे नेते म्हणत आहेत. मात्र उबाठाने या प्रकाराची गंभीर दखल घेतल्याचे म्हटले आहे. यामुळे उबाठा-मनसेची युती यापुढे टिकणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आज कोकण भवन येथे कल्याण-डोंबिवलीत निवडून आलेल्या शिंदे गटाच्या नगरसेवकांनी अधिकृतपणे स्वतंत्र गट स्थापन केला. याचवेळी मनसेच्या नगरसेवकांनीही स्वतंत्र गट स्थापन करत शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे कल्याण- डोंबिवलीतील राजकारणात नवेच नाट्य पाहायला मिळाले. यासाठी आज आणि काल रात्री शिंदे गटाचे डॉ. श्रीकांत शिंदे आणि मनसेचे नेते व माजी आमदार राजू पाटील यांची दोनदा संयुक्त बैठक झाली. त्यानंतर मनसेने शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याची अधिकृत घोषणा डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाचे 53 नगरसेवक, भाजपाचे 50, ठाकरे गटाचे 11, तर मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत. महापौर पदासाठी बहुमताचा आकडा 62 आहे. मनसेच्या 5 नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर शिंदे गटाचा आकडा 58 वर पोहोचला असून, बहुमतासाठी अजून 4 नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे चार नगरसेवक नॉट रिचेबल असल्याने हे नगरसेवकही शिंदे गटात जाणार का, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
मनसेच्या पाठिंब्यानंतर डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले की, शिंदे गटाने आज 53 नगरसेवकांचा स्वतंत्र गट स्थापन केला आहे. मनसेनेही पाच नगरसेवकांचा गट स्थापन केला. त्यांनी शिंदे गटाला समर्थन दिले आहे. काही जणांना वाटत असेल की, भाजपाला बाजूला ठेवून आम्ही सत्ता स्थापन करत आहोत. मात्र तसे नाही. भाजपा आणि शिंदे गटासह सर्वांना एकत्र घेऊनच सत्ता स्थापन केली जाईल. भाजपा आणि आमचा पक्ष महायुती म्हणून निवडणूक लढले होते. कल्याण-डोंबिवलीत महायुतीचीच सत्ता स्थापन होणार आहे. आम्ही निवडणूक वेगवेगळ्या चिन्हांवर लढलो असलो, तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी जे सोबत येतील, त्यांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. जे जे आमच्यासोबत येतील, त्यांचे स्वागत आहे. जितके जास्त लोक सोबत येतील, तितके चांगले आहे. मनसेलाही तसेच वाटत असावे. राजू पाटील माझे मित्र आहेत. विकासाच्या मुद्यावरून सर्वांनी एकत्र यावे, असे त्यांना वाटत असल्याने त्यांनी महायुतीला समर्थन दिले आहे. आमची महापौर, उपमहापौर किंवा सभापती पदांबाबत सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. या सर्व निर्णयांचे अधिकार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहेत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर सत्तास्थापनेबाबत निर्णय घेतला जाईल.
तर मनसेचे माजी आमदार राजू पाटील म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेली आकडेमोड, पळवापळव आणि राजकीय खेळी पाहता ही परिस्थिती लवकर बदलेल, असे आम्हाला वाटत नव्हते. भविष्यात समित्या, विविध उपसमित्यांच्या निवडणुकांच्या वेळीही गोंधळ निर्माण होण्याची शक्यता दिसत होती. या परिस्थितीत कुठेतरी एक बाजू स्थिर राहावी या उद्देशाने आम्ही महायुतीला पाठिंबा दिला आहे. आम्हाला काही मिळण्यासाठी नाही, तर विकासाची कामे व्हावीत यासाठी आम्ही पाठिंबा दिला. आम्ही उबाठात युतीत लढलो होतो. निकालानंतर काही नगरसेवक गायब झाले. त्यामुळे आम्हाला आमच्या नगरसेवकांचीही चिंता होती आणि त्यांच्याही नगरसेवकांची चिंता होती. कुठल्याही स्वार्थासाठी घेतलेला हा निर्णय नाही. आम्ही ठामपणे समोर आलो आहोत. इथले निकाल आल्यावर आम्ही इथले गणित राज ठाकरेंना सांगितले तेव्हा स्थानिक पातळीवर जो तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल तो घ्या, असे साहेबांनी सांगितले. त्यानुसार आम्ही निर्णयघेतला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडेही याला दुजोरा देत म्हणाले की, युती-आघाडी करण्याचे अधिकार राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थितीनुसार स्थानिक नेतृत्वाने हा निर्णय घेतला असावा.
मनसेच्या या निर्णयामुळे उबाठा संतप्त झाली आहे. उबाठा खासदार संजय राऊत म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचा विषय अत्यंत चिंताजनक आहे. हा स्थानिक पातळीवरचा निर्णय आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. पक्षाच्या मूळ ध्येय धोरणाशी प्रतारणा करून कोणत्याही पक्षाचे नेतृत्व विपरित भूमिका घेत असेल तर पक्ष नेतृत्वाने कारवाई केली पाहिजे. कल्याण-डोंबिवलीचा विषय हा उद्धव ठाकरेंनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. काही मिळाले नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक आहेत. एकंदरीतच राजकारणातल्या मानसिकतेचा प्रश्न आहे. अशा प्रकारे गोष्टी करणारे हे मनोरुग्ण आहेत. राज ठाकरेंशी संवाद झाला. ते खूप खूप व्यथित आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, ही माझी भूमिका नाही. ही माझी पक्षाची भूमिका नाही. स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –
६०८ दिवस अंतराळात घालवणाऱ्या सुनिता विल्यम्स ‘नासा’तून निवृत्त
संजय गांधी उद्यानातील आदिवासी रस्त्यावर; घरं रिकामी करण्याच्या आरोपावरून आंदोलन










