मुंबई- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्या संपत आहे. गेली तीन अधिवेशनने विधानसभेत उबाठाचा (UBT) विरोधी पक्षनेता असावा हा प्रयत्न सुरू आहे, पण त्याला यश नाही. त्यातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते उबाठाचे अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची मुदत संपल्याने आता विधानसभा व विधान परिषद दोन्ही ठिकाणी विरोधी पक्षनेता नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे उद्या अधिवेशनच्या अखेरच्या दिवशी विधानसभा विरोधी पक्षनेतेपद उबाठाला देऊन मुख्यमंत्री फडणवीस (Fadnavis) हे उध्दव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मेहरबानी करतील का हा प्रश्न आहे. आज याच पदासाठी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधान भवनात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद द्या, अशी महाविकास आघाडीची मागणी आहे. हे पद उबाठाच्या भास्कर जाधव यांना देण्यात यावे, या मागणीसाठी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या दालनात ठाकरे आणि फडणवीस यांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, भास्कर जाधव हेदेखील उपस्थित होते. विशेष म्हणजे, काल विधान परिषदेतील अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी हसत-खेळत उद्धव ठाकरेंना सरकारमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी अधिकृतरित्या फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते पदासह त्रिभाषा सूत्रासारख्या काही महत्त्वाच्या विषयांवर या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक भेट दिले. विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असलेले 10 टक्के संख्याबळ महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे नाही. त्यामुळे आतापर्यंत विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळाले नाही. आवश्यक आमदार संख्या नसल्यास मुख्यमंत्री हे पद बहाल करू शकतात. पण फडणवीस यांनी अद्याप ते औदार्य दाखवले नाही. गेल्या अधिवेशनात याबाबत महाविकास आघाडीने तत्कालीन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निवेदन दिले होते. नाराज विरोधकांनी थेट अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी विरोधी पक्षनेत्याच्या निवडीबाबत राज्यपालांची देखील भेट घेतली होती. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही विरोधी पक्षनेते पदाच्या नावाची घोषणा झाली नाही. या अधिवेशनात विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये खडाजंगी झाली. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10 टक्के सदस्यसंख्येची अट नाही, असा दावा भास्कर जाधव यांनी केला. सरन्यायाधीश भूषण गवई सत्कारावेळी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी असेल. विरोधी पक्षाच्या वतीने सरन्यायाधीशांचे स्वागत होणार नाही, अशी खंत विरोधी पक्षांनी व्यक्त केली होती. विरोधी पक्षनेत्याच्या मुद्यावर महाराष्ट्रात लोकशाहीचा गळा कसा घोटला जात आहे, हे सांगण्याची वेळ आणू नका, असेदेखील भास्कर जाधवांनी त्यावेळी सुनावले होते. त्यानंतर महाविकास आघाडीच्यावतीने आमदार जितेंद्र आव्हाड व भास्कर जाधव यांनी भूषण गवई यांना विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसंबंधी निवेदन दिले होते. आता या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तरी विरोधी पक्षनेत्याची खुर्ची रिकामी राहू नये, यासाठी फडणवीस उद्धव ठाकरे यांची मदत करतील का? की यासाठी पुन्हा पुढच्या अधिवेशनापर्यंत वाट पाहावी लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विधान परिषद विरोधी पक्षनेते
सतेज पाटील की अनिल परब?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांच्या जागी नवे विरोधी पक्षनेते कोण होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. अंबादास दानवे विधान परिषदेत असताना उबाठा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे संख्याबळ सात होते. आता काँग्रेसकडे सात, तर शिवसेनेकडे 6 सदस्य आहेत. हे संख्याबळ पाहता विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. या पदासाठी सध्या सतेज पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. दुसरे नाव राजेश राठोड यांचे आहे. परंतु अंबादास दानवे यांना निरोप देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अंबादास दानवे तुमचा कार्यकाळ संपला. अनिल परब आता तुम्ही कामाला लागा, असे विधान केल्याने अनिल परबांचे नावही पुढे आले आहे.