Raj and Uddhav Thackeray BMC Election Manifesto – आज मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधू 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात एकत्र आले. मुंबई महापालिकेसाठी दोघांनी मिळून शिवशक्तीचा वचननामा, ठाकरेंचा शद्ब याचे प्रकाशन केले. या वचननाम्यात नवीन काहीच नव्हते. 2017 सालच्या पालिका निवडणुकीत आणि त्याआधीपासून 28 वर्षे पालिकेत सत्ता असताना संयुक्त शिवसेनेने सातत्याने रस्ते, शाळा, रुग्णालयाची जी आश्वासने दिली तीच पुन्हा दिली. वडिलांनी जी आश्वासने ऐकली होती तीच नातू ऐकत होता. दोन पिढ्यांच्या कानावर तीच वचने आदळली. यावेळी तरी वचनपूर्ती होईल का? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला. उद्या दोघा बंधूंची विक्रोळी येथे पहिली जाहीर सभा होत आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
वचननामा प्रकाशन करताना ठाकरे बंधूंनी भाजपा आणि महायुतीवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीका करून केली. ते म्हणाले की, आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाल्यासारखे वातावरण आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडल्यावर त्यांनी आमच्या उमेदवारांची पळवापळवी सुरू केली. बिनविरोध उमेदवार निवडून येणे, हा लोकशाहीचा अपमान आहे. भाजपाचा राहुल नार्वेकर हा आमदार विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतो. त्यांचा अधिकार विधानसभेत आहे. बाहेर ते फक्त एक आमदार आहेत. ते विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दमदाटी करतात, हे विधानसभा अध्यक्षपदाच्या प्रतिमेला छेद देणारे वक्तव्य आहे. ते नायक चित्रपटातील अनिल कपूरप्रमाणे एखाद्याचे संरक्षण काढून घ्यायला सांगतात. नार्वेकर यांच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे.
निवडणूक आयोगाने बिनविरोध निकालाचा अहवाल मागण्यापेक्षा तिथे पुन्हा निवडणूक प्रक्रिया सुरू करावी. आम्ही सत्ताधार्यांची मतचोरी पकडली आहे. त्यामुळे आता त्यांनी उमेदवारांची पळवापळवी आणि दमदाटी सुरू केली. राहुल नार्वेकर हे निष्पक्ष नसून त्यांनी पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. काल मुंबईत झालेल्या महायुतीच्या सभेचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले की, वरळी डोममध्ये डोमकावळे जमले होते. ते इकडून तिकडे गेलेलेच होते. जे मुंबईचा महापौर मराठी होणार, हिंदू होणार असे म्हणत होते. ते धर्माने कोण आहेत, ते त्यांना विचारा. मुंबईचा महापौर हा मराठीच होईल. पण आमच्यासोबत असताना भाजपाने मुंबईचे उपमहापौर कुणाला केले ते स्वत;ला त्यांनी विचारावे. आम्ही साधीच कामे केली. आम्ही साधे कोस्टल रोडचे काम केले. मध्य वैतरणाचे काम केले, कोरोना काळात कामे केली.
आमच्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी मोठी कामे केली आहेत, म्हणजे मोदींनी कैलास पर्वत बांधला, स्वर्गातून गंगा आणली. रिगलजवळ बाळासाहेबांचा पुतळा उभारण्यात आला ती जागा मी निवडली होती. त्याचा खर्चही आम्ही केला. तरीही श्रेय शिंदे घेत आहेत. पण तेही काम साधे आहे. त्यापेक्षा कैलास पर्वत मोदींनी आणला, स्वर्गातून गंगा आणली याचे श्रेय घ्या. ते का सांगत नाही? अरबी समुद्र शिंदे आणि फडणवीसांनी बांधला. समुद्र मंथन करून तिथे होणार असलेले शिवस्मारक पाण्यातून कधी बाहेर आणणार? एकनाथ शिंदे आणि फडणवीसांना कोणी ओळखत नव्हते, तेव्हापासून आम्ही कोस्टल रोडचे प्लानिंग केले आहे. आम्ही मुंबई महापालिकेत मुदत ठेवी 92 हजार कोटींपर्यंत नेऊन ठेवल्या होत्या. त्याच पैशातून टोलमुक्त कोस्टल करून दाखवला. पण गडकरींचा मुंबई-गोवा महामार्ग 200 वर्षांत तरी पूर्ण होईल का ते माहीत नाही. आमचे अनेक प्रकल्प यांनी रद्द केले. समुद्राचे पाणी पिण्यायोग्य करण्याच्या प्रकल्पासाठी आम्ही तरतूदही केली होती. पण तो प्रकल्प रद्द करून टाकला. आम्ही मराठी सक्तीची केली तो आदेशही यांनी मागे घेतला. या खोकेसुरांनी 3 लाख कोटींचा घोटाळा केला आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा झाला तर मुंबईचे अदानीस्थान होईल.
वचननामा निवडणूक आयोगाला पाठवून मंजूर करून घ्यावा लागतो. त्यामुळे शाब्दिक आक्षेप नको म्हणून मुंबईकर असा शब्द वापरलेला आहे, असा खुलासा करत उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोनाकाळात केलेल्या कामाची पुस्तिका प्रकाशित करण्यास निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. पण आम्ही ती प्रसिद्ध करणारच. काय व्हायचे ते होऊ द्या. राज ठाकरे या वचननाम्याच्या निमित्ताने 20 वर्षांनी पहिल्यांदा सेनाभवनात आले होते. त्यांनी जुन्या सेना भवनातील आठवणींना यावेळी उजाळा दिला. त्यानंतर ते म्हणाले की, आता होत आहेत तशा बिनविरोध निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या तेव्हा भारतीय पक्ष सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आता त्या पक्षाचे आता महाराष्ट्रात काय घडते आहे, त्याबाबत काय म्हणणे आहे ते सांगावे. आज तुम्ही सत्तेत आलात तेव्हा काँग्रेसने हे केले ते केले म्हणून आम्ही हे करतो अशी बोंबाबोंब करता. पण उद्या परिवर्तन झाल्यावर सत्तेवर येणारे जे करतील त्यावर तुम्ही तेव्हा काय बोलाल? महाराष्ट्र हे सुसंस्कृत राज्य आहे. देशाला विचार देणारे राज्य आहे. या राज्याचा बिहार, यूपी करायला निघाले आहेत,
हे थांबायला हवे. ह्यांना वाटते की, आपण सत्तेवरून कधीच जाणार नाही? पण उद्या तुम्ही जाल. पण तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने जेव्हा पुढे वापर सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका. मराठी महापौरच्या मुद्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा महाराष्ट्र आहे आणि इथला प्रत्येक महापौर हा मराठीच होणार. यात कसले हिंदी मराठी करता? पेशवे काळात मराठ्यांचे संस्थान असलेल्या बडोद्यात सगळे महापौर गुजरातीच होतात. तिथे मराठी महापौर का होत नाही? हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीचा मान ठेवलाच पाहिजे. मुंबईचा महापौर मराठीच होणार. आमच्या चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र यांना अडवू तर दे म्हणजे त्यांचे ढोंग समोर येईल.
वचननाम्यातील आश्वासने
मुंबईतील नागरिकांना 100 युनिटपर्यंत वीज मोफत
700 चौ. फुटांपर्यंत मालमत्ता कर माफ
कचरा कर रद्द करणार
बेस्ट दरवाढ कमी करणार
10,000 इलेक्ट्रिक बस आणणार
महिला व विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास
शासकीय, महापालिका, बेस्ट, पोलीस, गिरणी कर्मचार्यांना घरे, 5 वर्षांत 1 लाख मुंबईकरांना घरे
मुंबईतील कोळीवाडे आणि आदिवासी पाडे यांचा विकास
घरकाम करणार्या नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी
महापालिकेच्या शाळा बिल्डरांच्या घशात जाऊ देणार नाही
10 रुपयांत जेवण आणि नाश्ता
नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांच्या मुलांसाठी पाळणाघरे
पाळीव प्राण्यांसाठी दवाखाना
बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना
महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग
उत्तम दर्जाचे रस्ते, कंत्राटदाराकडून रस्त्याची 15 वर्षांची हमी
दहावीनंतर महापालिका शाळेत बारावीपर्यंत ज्युनियर कॉलेज
मुंबई पब्लिक स्कूलचा दर्जा अत्याधुनिक करणार
सुपर स्पेशालिस्ट कॅन्सर रुग्णालय
फुटपाथ आणि मोकळ्या जागा
मुंबईबाहेर नेलेले प्रकल्प मुंबईत परत आणणार.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
किरकोळ वादाचा रक्तरंजित थरार; नांदेडमध्ये दोन गटांत तुफान राडा..









