Nilesh Lanke Meets PM Modi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू असताना अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी सुरू असलेल्या मोहिमेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त रायगडावर आयोजित सोहळ्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. विशेष म्हणजे, पंतप्रधान मोदी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत रायगडावर येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी शिवविचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या या मोहिमेचा गौरव केला. “गड-किल्ले हे केवळ दगड-मातीचे अवशेष नसून ते स्वराज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत,” असे सांगत पंतप्रधानांनी ही मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. या भेटीवेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रियांका गांधी आणि महाराष्ट्रातील इतर खासदार उपस्थित होते.
शेतकरी आणि कांदा प्रश्नावर आग्रही मागणी
सांस्कृतिक वारशासोबतच खासदार निलेश लंके यांनी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले. प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी खालील मागण्या मांडल्या:
- सध्या सुरू असलेली कांदा निर्यात कोणत्याही परिस्थितीत सुरूच ठेवावी, जेणेकरून बाजारात भाव कोसळणार नाहीत.
- नाफेड आणि एनसीसीएफकडे शेतकऱ्यांची कांद्याची जी थकबाकी आहे, ती तातडीने अदा करावी.
- कांद्याचे भाव स्थिर राहतील यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक पावले उचलावीत.
वाड्या-वस्त्यांचा विकास आणि रस्ते जोडणी
ग्रामीण भागातील दळणवळणाच्या समस्या मांडताना खासदार निलेश लंके यांनी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील त्रुटींकडे लक्ष वेधले. आजही 250 पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अनेक वाड्या-वस्त्या पक्क्या रस्त्यांपासून वंचित आहेत. अशा वस्त्यांना तातडीने रस्त्यांनी जोडल्यास शिक्षण, आरोग्य आणि शेतीमालाची वाहतूक करणे सोपे होईल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
रेल्वे आणि महामार्ग प्रकल्पांना गती देण्याची विनंती
नगर आणि पुणे जिल्ह्यांच्या औद्योगिक विकासासाठी दळणवळणाच्या प्रलंबित प्रकल्पांवर या भेटीत चर्चा झाली. सुपा औद्योगिक क्षेत्राचा विस्तार पाहता खालील प्रकल्पांची गरज त्यांनी व्यक्त केली:
- पुणे-नगर रेल्वे प्रकल्प आणि पुणे-नगर इंटरसिटी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरू करावी.
- पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामाला वेग द्यावा, जेणेकरून रोजगाराच्या संधी वाढतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सर्व मागण्यांचे निवेदन स्वीकारले असून, विकास, शेतकरी हित आणि वारसा जपणे या त्रिसूत्रीवर केंद्र सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही निलेश लंके यांना दिली आहे.
हे देखील वाचा – ED : सोनू सूद, युवराज सिंगसह अनेक सेलिब्रिटींना ईडीचा दणका! कोट्यवधींची मालमत्ता जप्त; काय आहे प्रकरण?









