MSEDCL WhatsApp Service: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने (महावितरण) आपल्या ग्राहकांसाठी डिजिटल क्रांतीच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता ग्राहकांना वीज बिल पाहण्यापासून ते देयक भरण्यापर्यंतच्या सर्व सुविधा एकाच व्यासपीठावर म्हणजेच व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘ईझ ऑफ डुइंग बिझनेस’ या संकल्पनेला अनुसरून आणि महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे.
3 कोटी ग्राहकांना होणार फायदा
राज्यातील 3.12 कोटींहून अधिक ग्राहकांसाठी, ज्यात पुणे विभागातील 39 लाख ग्राहकांचा समावेश आहे, ही सेवा 13 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे. व्हॉट्सॲप हे दैनंदिन जीवनातील अविभाज्य साधन असल्याने, ग्राहकांना आता महावितरणचे ॲप किंवा वेबसाईटवर न जाता थेट चॅटिंगच्या माध्यमातून आपली कामे पूर्ण करता येतील.
असा करा सुविधेचा वापर
महावितरणची ही सेवा वापरण्यासाठी ग्राहकांना खालील प्रक्रिया करावी लागेल:
- महावितरणचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर 9167777791 आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.
- या नंबरवर Hi असा मेसेज पाठवा.
- त्यानंतर तुमची पसंतीची भाषा (मराठी, हिंदी किंवा इंग्रजी) निवडा.
- उपलब्ध पर्यायांपैकी तुम्हाला हवी असलेली सेवा निवडून पुढची प्रक्रिया पूर्ण करा.
व्हॉट्सॲपवर मिळणाऱ्या मुख्य सुविधा
चॅटबॉट सपोर्ट: ग्राहकांच्या शंकांचे त्वरित निरसन करण्यासाठी एक इंटरअॅक्टिव्ह चॅटबॉट देखील तैनात करण्यात आला आहे.
बिल पाहणे आणि भरणे: ग्राहक आपले चालू महिन्याचे वीज बिल पाहू शकतात आणि यूपीआय किंवा डेबिट कार्डद्वारे लगेच पेमेंट करू शकतात.
ई-बिल आणि पावती: डिजिटल बिल डाउनलोड करण्याची आणि पैसे भरल्यानंतर त्याची पावती त्वरित मिळवण्याची सोय यात आहे.
तक्रार नोंदणी: वीज पुरवठा खंडित होणे किंवा बिलातील त्रुटींबाबत तक्रार नोंदवून त्याचा स्टेटस ट्रॅक करता येईल.
नवीन कनेक्शन: नवीन वीज कनेक्शनसाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ग्राहकांना घरबसल्या पाहता येईल.
गो-ग्रीन सुविधा: कागदी बिलाऐवजी ई-बिल सुविधेचा पर्याय निवडण्याची किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.










