MSRTC Bus Concession : राज्याच्या परिवहन विभागाने शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एक मोठे ‘गिफ्ट’ दिले आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शालेय व महाविद्यालयीन सहलींसाठी दररोज 800 ते 1,000 नवीन बसेस उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
या निर्णयामुळे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक या सर्वांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आणि दिवाळीच्या सुट्टीनंतर शैक्षणिक सहलींना जाण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
MSRTC (महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ) यावर्षी शालेय वार्षिक सहलींसाठी नवीन बसेस उपलब्ध करून देत असून, विद्यार्थ्यांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवास मिळावा, यासाठी त्यांच्या एकूण भाड्यामध्ये 50 टक्के सवलत जाहीर करण्यात आली आहे.
नवीन बसेसची उपलब्धता आणि नियोजन
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस डेपोमधून शाळा आणि महाविद्यालयांना दररोज सुमारे 800 ते 1,000 नवीन बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
चालू शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी मंत्र्यांनी डेपो व्यवस्थापक आणि स्टेशन प्रमुखांना शैक्षणिक संस्थांशी तातडीने समन्वय साधण्याचे निर्देश दिले आहेत. राज्याचे प्रमुख ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे तसेच इतर प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी नियोजन करण्याकरिता आगार प्रमुख, स्टेशन अधिकारी हे शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना भेटणार आहेत.
मागील वर्षाचा अनुभव
मागील वर्षी, म्हणजेच नोव्हेंबर 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत MSRTC ने शैक्षणिक सहलींसाठी एकूण 19,624 बसेस पुरवल्या होत्या. या माध्यमातून राज्य परिवहन मंडळाला परतफेडीसह 92 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकात देण्यात आली आहे.
हे देखील वाचा – Delhi Blast : दिल्ली स्फोटात वापरण्यात आलेली कार कोणाच्या नावावर होती? NIA ने केला खुलासा









