Mumbai Bomb Threat | मुंबई (Mumbai) शहराला पुन्हा एकदा सुरक्षा इशारा मिळाला आहे. मुंबई पोलिसांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) आणि प्रतिष्ठित ताजमहाल पॅलेस हॉटेलला (Taj Mahal Palace Hotel) बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ईमेल प्राप्त झाला आहे.
विशेष म्हणजे, या ईमेलमध्ये संसद हल्ल्याच्या मास्टरमाईंड अफझल गुरूच्या फाशीला अन्यायकारक ठरवण्यात आलं आहे. तसेच, या फाशीचा बदला घेणार असल्याचे म्हटले आहे.
हा ईमेल गुरुवारी सकाळी विमानतळ पोलिस ठाण्याच्या अधिकृत ईमेल आयडीवर (official email ID) viduthalai_puli_vellum@outlook.com या पत्त्यावरून प्राप्त झाला. ईमेलद्वारे ताज हॉटेल आणि विमानतळावर हल्ल्याची धमकी देण्यात आली असून, कारण म्हणून अफझल गुरू आणि सावक्कू शंकरला दिलेल्या “अन्यायकारक फाशी”चा उल्लेख करण्यात आला आहे.
ताजमहाल हॉटेल हे 26/11 च्या (26/11 attack) भीषण दहशतवादी हल्ल्याचे केंद्र होते. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) दहशतवाद्यांनी या हॉटेलवर हल्ला करून 167 जणांचे बळी घेतले होते. तेव्हापासून हे हॉटेल दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर कायम आहे आणि येथे नेहमी सुरक्षा असते.
ईमेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी ताज हॉटेल आणि विमानतळ परिसरात कसून तपास केला, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. या प्रकरणी पोलिसांनी ईमेल पाठवणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, डिजिटल फूटप्रिंट्सचा माग काढण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, सावक्कू शंकरचा उल्लेख या ईमेलमध्ये करण्यात आला असला तरी त्याचा अफझल गुरूसारख्या गुन्हेगाराशी संबंध नाही. शंकर हे एक माजी कनिष्ठ लिपिक असून भ्रष्टाचार विरोधात लढा दिल्यामुळे ते यूट्यूबर आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच, जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) दहशतवादी अफझल गुरुला 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या संसद हल्ल्याचा मास्टरमाईंड म्हणून 9 फेब्रुवारी 2013 रोजी फाशी देण्यात आली होती.