BMC Election : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या धामधुमीत मुंबई महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे यांच्यात युतीचे संकेत मिळताच महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडली आहे.
आता मुंबईत स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे.
आंबेडकरांची ‘५०-५०’ ची अट
काँग्रेस नेत्यांनी नुकतीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन युतीबाबत चर्चा केली. मात्र, या चर्चेत आंबेडकरांनी ५०-५० टक्के जागा वाटपाचा कडक फॉर्म्युला समोर ठेवला आहे. मुंबईच्या २२७ जागांपैकी निम्म्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. “मुंबईत आमची ताकद मोठी असून २०० जागांवर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे,” असे म्हणत आंबेडकरांनी काँग्रेसवर दबाव वाढवला आहे.
या प्रस्तावामुळे काँग्रेसचे नेतृत्व पेचात पडले असून, आता मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची समिती यावर पुढील निर्णय घेणार आहे.
“काँग्रेसचा जुना खेळ सुरू” – प्रकाश आंबेडकरांचा आरोप
युतीच्या चर्चेदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “काँग्रेस लोकं जे बोलतात, त्याच्या अगदी उलट वागतात. आम्ही कोणाकडेही गेलो नाही, उलट काँग्रेसचेच लोक आमच्याकडे आले आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
ज्या ठिकाणी काँग्रेसने योग्य वर्तन केले नाही, तिथे त्यांना उडवून लावल्याचे सांगत आंबेडकरांनी काँग्रेसला स्पष्ट इशारा दिला आहे. तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कधीही एकत्र येणार नाहीत, याची आपल्याला पूर्ण कल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार
महानगरपालिका निवडणुकीत केवळ भाजप आणि वंचित बहुजन आघाडी या दोनच पक्षांकडे ५० टक्के उमेदवार उभे करण्याची क्षमता आहे, असा विश्वास आंबेडकरांनी व्यक्त केला. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर वंचितचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच त्यांनी स्थानिक पातळीवर युती करण्याचे सर्व अधिकार जिल्हा कमिट्यांना दिले आहेत. सध्या ‘नवरदेव तयार असून मुली पाहण्याचा कार्यक्रम सुरू आहे’, अशी मिश्किल टिप्पणी करत त्यांनी जोपर्यंत योग्य प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत लग्न (युती) लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.









