Mumbai BMC Election : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या चर्चाना आता राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस पक्षात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. युतीबाबतचे तर्क-वितर्क सुरू असतानाच काँग्रेसचे ज्येठ नेते आणि माजी मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी याबद्दल वक्तव्य दिल आहे. काँग्रेस पक्ष ठाकरे बंधूंसोबत, म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, या दोघांच्या पक्षांसोबत युती करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना हीच भूमिका स्पष्ट केली होती आणि आजही त्यात कोणत्याही प्रकारचा बदल नाही. असे जगताप यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महानगरपालिकेच्या रणांगणात काँग्रेस स्वतंत्रपणे उतरणार का असे प्रश्न आता निर्माण झाले आहेत.
भाई जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही स्थानिक कार्यकर्त्यांची असते, नेत्यांची न्हवे. गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचीसुद्धा इच्छा असते की, त्यांनी देखील कधीतरी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या, त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक आहोत, त्यामुळे आम्ही स्वबळावर लढू, हीच आमची भूमिका असेल.
यावर ते पुढे म्हणाले राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही त्यांनी रमेश चेन्निथला यांच्यासमोर हीच भूमिका उघडपणे मांडली आहे. राज ठाकरे तर दूरच, पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नसल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
दरम्यान, भाई जगताप यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर वाच्यता केली आहे. ते म्हणतात महाविकास आघाडीत शिवसेना एकटी नव्हती. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा त्यांची शिवसेना एकत्र होती, पण आता शिवसेना दुभागली आहे. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांनीच घ्यावा. पुढे ते म्हणतात काँग्रेसने आजवर कधीही राज ठाकरेंसोबत जाण्याचा विचार केलेला नाही. उद्धव ठाकरेंसोबत देखील जायची स्थानिक कार्यकर्त्यांची तयारी नाही. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे असे देखील ते म्हणाले.
राज्याच्या राजकीय पटलावर मुंबई महानगरपालिका निवडणूक हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. मुंबईवर सत्ता प्रस्थापित करणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात बळ मिळवण्यासारखं आहे, असा समज आहे. अशा वेळी भाई जगताप यांचे वक्तव्य काँग्रेसच्या स्वतंत्र लढाईच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरू शकते का हे पाहन आता महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Ravindra Dhangekar : धंगेकरांची पक्षातून हकालपट्टी होणार? धंगेकर स्पष्टच बोलले..