Mumbai Bomb Threat : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील विविध दंडाधिकारी न्यायालयांना (Magistrate Courts) बॉम्बने उडवून देण्याची भयानक धमकी देण्यात आली आहे. यामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या धमकीच्या सत्रानंतर मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील न्यायालयांना एका अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे ही धमकी पाठवण्यात आली आहे. या ईमेलमध्ये न्यायालयाच्या इमारतींमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आणि त्या उडवून देण्याचा उल्लेख देखील करण्यात आला होता. ईमेल मिळताच संबंधित प्रशासनाने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.
धमकीचे गांभीर्य लक्षात घेता, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक न्यायालयांमधील कामकाज त्वरित थांबवण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून न्यायालयाच्या इमारती देखील रिकाम्या करण्यात आल्या कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. यामुळे न्यायालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.
धमकी मिळताच स्थानिक पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकांना (BDDS) घटनास्थळी तात्काळ पाचारण करण्यात आले. तपासणी पथकाकडून श्वान पथकाच्या साहाय्याने न्यायालयाच्या कानाकोपऱ्याची कसून तपासणी केली जात असल्याची माहिती आहे. धमकीचा ईमेल नेमका कोठून आला आणि त्याचा आयपी (IP) ॲड्रेस काय आहे, याचा अधिक शोध मुंबई पोलिसांचे सायबर सेल घेत आहे.
स्थानिक पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केली असून नागरिकांना घाबरून न जाण्याचे आवाहन देखील केले जात आहे. ही केवळ अफवा आहे की घातपाताचा मोठा कट, याचा तपास सध्या युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. अद्यापपर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू सापडलेली नसून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस सर्व यंत्रणा तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा – Manikrao Kokate : अटकेच्या भीतीने कोकाटेंची प्रकृती बिघडली? कोकाटे ICU मध्ये दाखल








