Mumbai Central: मुंबई सेंट्रल स्टेशनचं नाव बदलणार? कोणाचं नाव देणार? जाणून घ्या

Mumbai Central Railway Station Name Change

Mumbai Central Railway Station Name Change | मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नाव लवकरच बदलण्यात येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत माहिती दिली आहे.

या ऐतिहासिक व महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनला जगन्नाथ नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या निर्णयामुळे मुंबईच्या इतिहासातील दिग्गजाला सन्मान मिळण्याची अपेक्षा आहे

नामकरणाची मागणी

शिवसेना (ठाकरे गट) आमदार भास्कर जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पुतळा नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मुंबई सेंट्रलला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी केली. फडणवीस यांनी सांगितले की, CSMT च्या पुनर्विकासात शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारला जाईल. तर, नाना शंकरशेठ यांच्या रेल्वे आणि मुंबईच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून, यासोबतच शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार असल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली.

दररोज लाखो प्रवासी या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करतात, ज्यामुळे ते मुंबईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे आहे. केंद्राच्या मंजूरीनंतर या रेल्वे स्टेशनचे नाव बदलले जाण्याची शक्यता आहे.