Deepfake Fraud: गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी प्रसिद्ध भारतीय शेअर बाजार तज्ज्ञांच्या (Stock Market Experts) डीपफेक (Deepfake) व्हिडिओंचा वापर करणाऱ्या एका मोठ्या आणि अत्याधुनिक फसवणूक नेटवर्कचा पर्दाफाश मुंबई सायबर पोलिसांनी केला आहे. या घोटाळ्यात कथित सहभाग असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी बेंगळुरूमधून 4 जणांना अटक केली आहे.
तपासातून उघड झाले आहे की, चिनी कंपन्यांनी हे दिशाभूल करणारे गुंतवणुकीचे जाहिरात व्हिडिओ ऑनलाइन प्रसारित करण्यासाठी भारतीय मार्केटिंग फर्म्सना कोट्यवधी रुपयांचे करार दिले होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 2 इंजिनिअर्स आणि 1 एमबीएपदवीधराचा समावेश आहे.
भारतातील पहिले डीपफेक फसवणूक प्रकरण
तपासकर्त्यांच्या मते, डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून गुंतवणुकीत फसवणूक केल्याचे हे भारतातील पहिले प्रकरण असू शकते. एका प्रतिष्ठित शेअर बाजार तज्ज्ञाने सोशल मीडियावर स्वतःचे खोटे व्हिडिओ प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुंबई सायबर पोलिसांशी संपर्क साधला आणि हे प्रकरण उघडकीस आले.
हे बनावट व्हिडिओ शेअर ट्रेडिंगबद्दल खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत होते.
तपास आणि आरोपींना अटक:
या तक्रारीची गंभीर दखल घेत, डीसीपी (सायबर क्राइम) पुरुषोत्तम कराड यांनी त्वरित चौकशीचे आदेश दिले. सायबर पोलीस (पश्चिम विभाग) च्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने व्हिडिओचा स्रोत शोधण्यास सुरुवात केली.
व्हिडिओ आसाममधील एका महिलेच्या खात्यातून प्रथम अपलोड झाले होते. चौकशीत तिने सांगितले की, ती “व्हॅल्यूलीफ” (Valueleaf) नावाच्या बेंगळुरूस्थित जाहिरात एजन्सीसाठी काम करते, जी या जाहिराती चालवत होती. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी कंपनीच्या बेंगळूरू कार्यालयावर छापा टाकला आणि हे डीपफेक प्रचारात्मक व्हिडिओ अपलोड करण्याची जबाबदारी याच कंपनीची असल्याची पुष्टी केली. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये जिजिल सेबॅस्टियन (44), दिपायन तपन बॅनर्जी (30), डॅनियल अरुमुघम (25) आणि चंद्रशेखर भीमसेन नाईक (42) यांचा समावेश आहे.
चीन आणि 3 कोटींचा करार
आरोपींनी चौकशीदरम्यान कबूल केले की, हे व्हिडिओ हॉंगकॉंगस्थित फर्स्ट ब्रिज नावाच्या कंपनीच्या वतीने तयार आणि प्रसारित करण्यात आले होते. ही कंपनी चिनी कंपन्यांशी संबंधित असून, त्यांनी ही मोहीम चालवण्यासाठी भारतीय फर्मला सुमारे 3 कोटी रुपये दिले होते.
तपासकर्त्यांनी सांगितले की, हे व्हिडिओ खोटे असून जनतेचे आर्थिक नुकसान करू शकतात, याची आरोपींना पूर्ण जाणीव होती, तरीही त्यांनी ते जाणीवपूर्वक प्रसारित केले. मेटाने हे कंटेंटदिशाभूल करणारे म्हणून फ्लॅग केल्यानंतर, आरोपींनी पकडले जाण्याच्या भीतीने जाहिरात खात्यांची संख्या 18 वरून 38 पर्यंत वाढवली आणि त्यांचे नोंदणीकृत डोमेन स्थान दुबई मध्ये बदलले.
दरम्यान, याप्रकरणी मुंबई पश्चिम विभाग सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) चे कलम 418(4), 419(2), 420(2), आणि 465(2) सह माहिती तंत्रज्ञान कायद्याचे (IT Act) कलम 66(A) आणि 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाने चारही आरोपींना 20 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
हे देखील वाचा – Muhurat Trading 2025: मुहूर्त ट्रेडिंग म्हणजे काय? दरवर्षी दिवाळीलाच ते का केले जाते? वाचा