31 वर्षांच्या सेवेनंतर ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ दया नायक सेवानिवृत्त, ‘या’ मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात होता सहभाग

Encounter Specialist Daya Nayak Retirement

Encounter Specialist Daya Nayak Retirement: मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगात भीती निर्माण करणारे प्रसिद्ध ‘एन्काऊंटर स्पेशलिस्ट’ दया नायक (Daya Nayak Retirement) हे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. 31 जुलै 2025 रोजी ते सेवा निवृत्त झाले. 1995 मध्ये मुंबई पोलिसात रुजू झालेले नायक यांनी 31 वर्षे समर्पित सेवा दिली. निवृत्तीच्या दोन दिवस आधीच त्यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती मिळाली होती.

भावनिक निरोप

निवृत्तीनंतर नायक यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत पोलीस सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “31 वर्षे समर्पितपणे सेवा दिल्यावर मी अभिमानाने आणि आभाराने निवृत्त होत आहे,” असे त्यांनी लिहिले. त्यांनी आपले वरिष्ठ, सहकारी आणि जनतेचे आभार मानले. वर्दीची शिस्त त्यांच्या पुढील आयुष्यातही कायम राहील, असे ते म्हणाले.

गुंडांचा खात्मा

1990 च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्या टोळ्यांविरुद्ध नायक यांनी 86 गुंडांचा खात्मा केला. त्या काळात मुंबईत गुंडगिरीने थैमान घातले होते. त्यांच्या पद्धतींवर मानवाधिकार संस्थांनी टीका केली असली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

दया नायक यांची कारकीर्द

उडुपी येथे जन्मलेले नायक 1979 मध्ये मुंबईत आले. हॉटेलात काम करताना त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक आरोपांना देखील सामोरे जावे आले. 2004 मध्ये बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावर त्यांच्यावर छापा टाकला गेला, पण निर्दोष ठरून ते पुन्हा सेवेत रुजू झाले. 2014 मध्ये निलंबनानंतर 2016 मध्ये त्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली.

अनेक मोठ्या प्रकरणाचा तपास

फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, नायक यांनी सलमान खानच्या घरावरील गोळीबार, बाबा सिद्दीकी हत्या, अनिल अंबानी यांच्या निवासस्थानावरील धमकी आणि सैफ अली खानच्या घरातील चोरीसारख्या प्रकरणांचा तपास केला. त्यांच्या आयुष्यावर आधारित ‘अब तक छप्पन’ हा चित्रपटही आला आहे.