BMC Election: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या रणधुमाळीत गुरुवारी मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मतदारांनी आपला हक्क बजावला. मुंआता सर्वांना प्रतीक्षा आहे ती निवडणुकीच्या निकालाची.
या राजकीय लढाईत सर्वाधिक चर्चा आहे ती देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेची. मुंबईचा महापौर होणे ही कोणत्याही पक्षासाठी प्रतिष्ठेची बाब मानली जाते. पण तुम्हाला माहित आहे का, की आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबईच्या महापौरांना पगार किती मिळतो?
पगार नाही तर मिळते ‘मानधन’
अनेक राज्यांच्या बजेटपेक्षाही मोठे बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या प्रमुखाला मोठा पगार मिळत असेल, असे अनेकांना वाटते. मात्र, वस्तुस्थिती वेगळी आहे. मुंबईच्या महापौरांना पगार मिळत नाही, तर दरमहा नियमित मानधन दिले जाते.
- मूळ मानधन: अंदाजे ६,००० रुपये प्रति महिना.
- एकूण मासिक उत्पन्न: विविध भत्ते मिळून हे उत्पन्न ५० ते ५५ हजार रुपयांपर्यंत जाते.
- वार्षिक उत्पन्न: वर्षाला साधारण ६ ते ६.५ लाखांपर्यंत मानधन मिळते. या पदासाठी ठराविक पगार नसल्याने त्यांना वार्षिक वेतनवाढ मिळत नाही. राज्य सरकार आणि महापालिकेच्या नियमांनुसार हे मानधन ठरवले जाते.
मिळणाऱ्या विशेष सोयी-सुविधा
मानधन जरी मर्यादित असले तरी, शहराचे ‘प्रथम नागरिक’ म्हणून महापौरांना अनेक आलिशान सुविधा पुरवल्या जातात:
- भव्य शासकीय निवासस्थान.
- शासकीय वाहन आणि खासगी वाहन चालक.
- निवासस्थानी कर्मचारी वर्ग.
- बैठका, अधिकृत दौरे आणि विशेष कार्यक्रमांसाठी स्वतंत्र भत्ते.
अधिकार आणि कार्यकाळ
मुंबईच्या महापौरांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा असतो. त्यांची निवड थेट जनतेतून होत नाही, तर निवडून आलेले नगरसेवक आपल्यातून एकाची महापौर म्हणून निवड करतात. महापौरांकडे प्रशासकीय अधिकारांपेक्षा कायदेविषयक अधिकार जास्त असतात. ते महापालिका सभागृहाच्या सर्व बैठकांचे अध्यक्षपद भूषवतात आणि शहराचे प्रतिनिधित्व करतात. ज्या पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात, त्याच पक्षाचा महापौर होण्याचा मार्ग सुकर होतो.









