Home / महाराष्ट्र / Mumbai Mega Block : रेल्वेवर रात्रीचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक: लोकल प्रवाशांच्या वेळापत्रकात मोठे बदल- परतीच्या प्रवासाचा होणार खोळंबा; शेवटच्या गाडीचीही बदलली वेळ!

Mumbai Mega Block : रेल्वेवर रात्रीचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक: लोकल प्रवाशांच्या वेळापत्रकात मोठे बदल- परतीच्या प्रवासाचा होणार खोळंबा; शेवटच्या गाडीचीही बदलली वेळ!

Mumbai Mega Block : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेल्या मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आगामी काही दिवस आव्हानात्मक ठरणार आहेत....

By: Team Navakal
Mumbai Local Mega Block
Social + WhatsApp CTA

Mumbai Mega Block : मुंबईच्या दळणवळण व्यवस्थेचा कणा असलेल्या मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आगामी काही दिवस आव्हानात्मक ठरणार आहेत. विशेषतः रात्री उशिरा लोकलने घरी परतणाऱ्या नोकरदारांना प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या पाडकामामुळे प्रवासात अडथळ्यांचा सामना करावा लागणार आहे. वरळी-शिवडी कनेक्टर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग म्हणून हा जुना पूल पाडून त्या ठिकाणी आधुनिक ‘डबलडेकर’ पूल उभारण्याचे नियोजन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) केले आहे. या क्लिष्ट तांत्रिक कामाची जबाबदारी ‘महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ (महारेल) या संस्थेकडे सोपवण्यात आली असून, या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष रात्रकालीन ब्लॉक मंजूर करण्यात आले आहेत.

ब्लॉकचे वेळापत्रक आणि कालावधी-
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या पाडकामासाठी सोमवारपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर दररोज रात्री विशेष ब्लॉक घेतला जात आहे. सोमवार ते शुक्रवार या कालावधीत रात्री ११:४० वाजता सुरू होणारा हा ब्लॉक पहाटे ३:४० वाजेपर्यंत, म्हणजेच सुमारे चार तास कार्यान्वित असेल. या निर्धारित वेळेत अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे स्थिग्र करण्यात येणार आहे. कामाची व्याप्ती लक्षात घेता, शनिवारी मध्यरात्रीनंतर सलग सहा तासांचा ‘महाब्लॉक’ घेण्याचे नियोजन करण्यात आले असून, याद्वारे उर्वरित महत्त्वाचे टप्पे पूर्ण केले जातील. यामुळे रात्रीच्या शेवटच्या आणि पहाटेच्या पहिल्या लोकल फेऱ्यांवर याचा थेट परिणाम होणार आहे.

लोकल आणि एक्स्प्रेस फेऱ्यांवरील परिणाम-
या ब्लॉकचा सर्वाधिक फटका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), कुर्ला आणि ठाणे या स्थानकांदरम्यान धावणाऱ्या उपनगरीय गाड्यांना बसणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले असून, कल्याण, कसारा आणि खोपोली या दिशेने येणाऱ्या काही लोकल गाड्या केवळ कुर्ला, ठाणे किंवा दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहेत. काही महत्त्वाच्या फेऱ्या सीएसएमटीऐवजी दादर स्थानकातूनच मार्गस्थ होतील, तर काही फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ उपनगरीय गाड्याच नव्हे, तर लांब पल्ल्याच्या काही मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही या कामामुळे बदल होण्याची शक्यता रेल्वेने वर्तवली आहे.

प्रवाशांची वाढती कसरत-
सध्या मुंबईत उन्हाचा तडाखा वाढत असतानाच रेल्वेच्या या कामामुळे प्रवाशांच्या मनस्तापात भर पडली आहे. मध्य रेल्वेवरील गाड्या आधीच काही कारणास्तव उशिराने धावत असताना, आता या रात्रकालीन ब्लॉकमुळे रात्री उशिरा घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासाचे नियोजन करताना वाढीव वेळ हाताशी ठेवूनच घराबाहेर पडावे.

Web Title:
संबंधित बातम्या