Mumbai : मुंबईतील फोर्ट परिसरात रिगल सिनेमाजवळील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अचानक हिरव्या कापडाने पूर्णपणे झाकण्यात आल्याने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुतळ्याची साफसफाई आणि देखभाल सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात असले तरी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वी हा पुतळा झाकण्यात आल्याने राज्यात चांगलीच चर्चा रंगल्याचे चित्र दिसत आहे.
पुतळा झाकण्यामागील कारण केवळ साफसफाई असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु वेळोवेळी राजकीय पार्श्वभूमी, युती आणि निवडणूक नजरेसमोर ठेवून या कृतीचा अर्थ लावला जात आहे. ऐन निवडणुकीच्या काळात आणि बाळासाहेबांच्या जयंतीपूर्वी पुतळा झाकण्यात आल्यामुळे शिवसेना आणि विरोधकांच्या राजकीय रणनीतीवरही चर्चा रंगणार आहे.
हा पुतळा २३ जानेवारी २०२१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण केला गेला होता आणि त्यानंतर ते शहरातील कार्यकर्त्यांसाठी आणि नागरिकांसाठी एक महत्त्वाचे प्रतिकात्मक ठिकाण ठरले आहे.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुतळा झाकल्याने अनेक राजकीय वर्तुळांमध्ये श्रेयवाद, धोरणात्मक हेतू आणि निवडणूक नजरेतून याची अर्थकाढणी सुरू झाली आहे. कार्यकर्ते आणि नागरिक या घटनेवर आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सामाजिक माध्यमांवरही या घटनेवर वादळासारखा प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.
वॉर्ड कार्यालय किंवा मुंबई महानगरपालिकेकडून अद्याप या घटनेबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. प्रशासनाने साफसफाईसाठी किंवा देखभालसाठी हा पुतळा झाकल्याचे संकेत दिले असले तरी, वेळोवेळी राजकीय संदर्भामुळे या कृतीला वेगळे अर्थही लावले जात आहेत. यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सडकून टीका केली आहे.

या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. राऊत म्हणाले की, “बाळासाहेबांची भीती देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या मनात जी बसलेली आहे, त्यातून हा निर्णय घेतला गेला आहे. ते भले हि हिंदूहृदय सम्राटांच्या विचारांबद्दल बोलत असतील पण मुळात त्यांच्या मनात बाळासाहेबांबाबत भीती असल्यामुळे हा पुतळा झाकण्यात आला आहे.”
संजय राऊत यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, “बाळासाहेब ठाकरे आता एका राजकीय पक्षाचे नेते राहिलेले नाहीत; त्यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा मिळाला आहे. गांधीजींचा पुतळा झाकला जातो का? अटल बिहारी वाजपेयींचे पुतळे झाकले जातात का? मग फक्त बाळासाहेबांचा पुतळा का झाकला जात आहे?” असे ते म्हणाले.
त्यांनी या घटनेमागील विरोधाभासी धोरणांवरही प्रकाश टाकत म्हटले की, “आपल्याला बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने अजूनही मते मागायची आहेत, पण त्यांच्या पुतळ्याला सुरक्षित ठेवण्याची किंवा सार्वजनिक दर्शनापासून दूर ठेवण्याची गरज नाही. अशी घणाघाती टीका देखील त्यांनी सरकारवर केली.
हे देखील वाचा – Umar Khalid : उमर-शरजील जामीनापासून वंचित; उमर -शरजील इमामला जामीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा थेट नकार









