Home / महाराष्ट्र / Mumbai News : अंधेरीतील अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळाची मदत घेणार

Mumbai News : अंधेरीतील अतिक्रमणांविरुद्ध महापालिकेचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’; अनधिकृत फेरीवाल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळाची मदत घेणार

Mumbai News : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता आक्रमक...

By: Team Navakal
Mumbai News
Social + WhatsApp CTA

Mumbai News : मुंबईतील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, बृहन्मुंबई महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेषतः पश्चिम उपनगरातील वर्दळीचे केंद्र असलेल्या अंधेरी (पश्चिम) म्हणजेच ‘के-पश्चिम’ विभागात अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या मोहिमेला बळकटी देण्यासाठी आणि अतिक्रमण निर्मूलन पथकाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महापालिका आता बाह्य स्रोतांद्वारे अतिरिक्त कंत्राटी मनुष्यबळ उपलब्ध करून घेणार आहे.

अतिक्रमण निर्मूलनासाठी विशेष मनुष्यबळ नियुक्ती-
अंधेरी रेल्वे स्थानक परिसर, एस. व्ही. रोड आणि महत्त्वाच्या अंतर्गत मार्गांवर अनधिकृत फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणावर बस्तान मांडले आहे. यामुळे या भागातील रस्ते अरुंद झाले असून नागरिकांना चालणेही जिकिरीचे झाले आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी महापालिकेने मार्च ते जुलै २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी विशेष कंत्राटी कामगारांची तुकडी तैनात करण्याचे नियोजन केले आहे. हे कामगार महापालिकेच्या अधिकृत अतिक्रमण विभागासोबत खांद्याला खांदा लावून प्रत्यक्ष कारवाईत सहभागी होतील.

नोंदणीकृत संस्थांना सहभागाचे आवाहन-
या मोहिमेसाठी आवश्यक असलेले कामगार पुरवण्यासाठी महापालिकेने विविध सहकारी संस्थांकडून बंद पाकिटात अर्ज मागवले आहेत. यामध्ये महानगरपालिकेकडे नोंदणीकृत असलेल्या स्थानिक अशासकीय संस्था (NGOs), मजूर सहकारी संस्था, सेवा सहकारी संस्था, बेरोजगार सेवा सहकारी संस्था आणि औद्योगिक सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव विहित मुदतीत सादर करणे अनिवार्य असून, ठराविक कालावधीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा-
‘के-पश्चिम’ विभागाच्या सहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली राबवण्यात येणारी ही मोहीम केवळ तात्पुरती कारवाई न ठरता, अतिक्रमणांचा कायमचा बंदोबस्त करणारी ठरावी, असा महापालिकेचा मानस आहे. अतिरिक्त मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे दिवसाच्या विविध सत्रांत आणि विशेषतः गर्दीच्या वेळी ही कारवाई सातत्याने सुरू ठेवणे शक्य होईल. यामुळे अंधेरीतील रस्ते मोकळे श्वास घेतील आणि पादचाऱ्यांसह वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या