Mumbai News : निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आल्याचे दिसून येते. आता अशातच घाटकोपर येथे भाजप आमदारांकडून एका रिक्षा चालकाला चोप दिल्याची घटना घडली आहे. आज आमदार पराग शाह (Parag Shah) यांनी एका रिक्षा चालकाला कानशिलात लगावली आहे. शिवाय या रिक्षाचालकाला शिवीगाळ केल्याचंही व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या आणि फुटपाथवर बस्तान मांडणाऱ्या दुकानदार तसेच अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात आमदार पराग शाह यांनी घाटकोपर येथे आज आंदोलन केल. आणि त्याच वेळी हा प्रकार घडला आहे.
जर रिक्षा चालकाने नियम मोडला असला तरी आमदाराने कायदा हातात घेण्याचे अधिकार आहेत का? असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे. काही लोकांनी पराग शाहांच्या या कृत्याचं कौतुक केलं असलं तरी आमदारांना कायदा हातात घेऊन रिक्षा चालकाला मारहाण करणे कितपत योग्य आहे असा सवाल आता विचारला जात आहे.
टिळक रोड परिसरात वाढत चाललेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे तसेच सातत्याने निर्माण होत असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत. या समस्येबाबत नागरिकांकडून वारंवार महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडे तक्रारी करूनही कोणतीही ठोस व परिणामकारक कार्यवाही होत… pic.twitter.com/9AL4uMeFuA
— Parag Shah (@ParagShahBJP) December 19, 2025
मुंबईतील घाटकोपर पूर्वेकडील भागात वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि पदपथांवर अतिक्रमण होत असल्याच्या अनेक तक्रारी सातत्याने येत होत्या. वल्लभबाग लेन आणि खौगली भागात अनेक दुकानदारांनी पदपथावर खुर्च्या आणि बाकडे ठेवून अतिक्रमण केले जात होते. त्यानंतर भाजपचे घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह यांनी या भागाला भेट दिली होती.
पराग शाहांच्या या भेटीदरम्यान, महात्मा गांधी मार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करत, चुकीच्या दिशेने गाडी चालवत एक रिक्षा चालक तिथे आला. त्या वेळी पराग शाह यांनी त्या रिक्षा चालकाला कानशिलात लगावत मारहाण केली.









