Home / महाराष्ट्र / मुंबईच्या पावसात पोलीस देवदूत ठरले ; बसमध्ये अडकलेल्या लहान मुलांना खांद्यावर उचलून वाचवले; पाहा व्हिडिओ

मुंबईच्या पावसात पोलीस देवदूत ठरले ; बसमध्ये अडकलेल्या लहान मुलांना खांद्यावर उचलून वाचवले; पाहा व्हिडिओ

Mumbai Police Viral video

Mumbai Police Viral video: मुंबईत (Mumbai Rain) सध्या मुसळधार पाऊससुरू असून, अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत मुंबई पोलिस (Mumbai Police Viral video) नागरिकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मुंबई पोलिसांचा माणुसकी दर्शवणारा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. माटुंगा येथील जलमय रस्त्यावर अडकलेल्या स्कूल बसमधून लहान मुलांना खांद्यावर घेऊन वाचवण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माटुंगाच्या किंग्ज सर्कलपरिसरातील डॉन बॉस्को स्कूलची एक बस पाण्यात बंद पडली. बसमध्ये सात विद्यार्थी आणि दोन महिला कर्मचारी अडकल्या होत्या. त्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. तात्काळ प्रतिसाद देत माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली.

पाण्यातून मुलांची सुरक्षित सुटका (Mumbai Police Viral video)

व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी पिवळ्या रेनकोटमध्ये कमरेपर्यंतच्या पाण्यातून मुलांना खांद्यावर आणि कडेवर घेऊन सुरक्षित बाहेर काढताना दिसत आहेत. दोन मिनिटांतच सर्व मुलांना सुरक्षित बाहेर काढले गेले. घाबरलेल्या मुलांना धीर देण्यासाठी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेले आणि बिस्किटे दिली.

यामुळे डीसीपी रागसुधा आर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पवार आणि माटुंगा पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शहरभर जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वाहतूक कोंडी झाली आहे. गेल्या 24 तासांत शहरात 54 मिमी, तर पूर्व आणि पश्चिम उपनगरांत अनुक्रमे 72 मिमी आणि 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

खराब हवामानाचा हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. अनेक विमाने उशिराने येत-जात आहेत. प्रवाशांनी आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) केले आहे. मदतीसाठी नागरिकांना 1916 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्यास सांगितले आहे.

हे देखील वाचा –

राज्यात पावसाचा धुमाकूळ! 6 जणांचा मृत्यू! मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी 48 तास रेड अलर्ट

अंतराळातून परतल्यानंतर शुभांशु शुक्ला यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, दिली ‘ही’ खास भेटवस्तू