Mumbai Pune Expressway Accident: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर काल (3 फेब्रुवारी) सायंकाळी एक भीषण अपघात झाला. पुण्याकडून मुंबईकडे जाणारा प्रोपिलिन गॅसचा टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. टँकरमधून अत्यंत ज्वलनशील असलेल्या प्रोपिलिन गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने तात्काळ आपत्कालीन पावले उचलली आहेत.
नेमकी घटना काय?
हा अपघात मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास घडला. टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळील वळणावर टँकर पलटी झाला. टँकरमधून गॅस गळती होत असल्याचे लक्षात येताच महामार्ग पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक तातडीने थांबवली. पुण्याकडे जाणारी वाहतूक अत्यंत खबरदारीने आणि संथ गतीने सुरू ठेवण्यात आली आहे.
बचावकार्य आणि सुरक्षा उपाय
घटनेची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, आयआरबी महामार्ग पोलीस, ‘देवदूत’ आपत्कालीन पथक, हेल्प फाऊंडेशनचे स्वयंसेवक आणि खोपोली अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परिसरात कोणतीही आगीची घटना घडणार नाही, याची कडक खबरदारी घेतली जात आहे.
वाहतुकीवर मोठा परिणाम
या अपघातामुळे द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. शेकडो प्रवासी तासनतास अडकून पडले आहेत. गॅस गळती पूर्णपणे थांबवून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरू केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आडोशी बोगद्याभोवती अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, शक्य असल्यास मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. जोपर्यंत संपूर्ण परिसर सुरक्षित घोषित केला जात नाही, तोपर्यंत येथील वाहतूक पूर्ववत होणार नाही.









