Kripashankar - महापालिका निवडणुकीत इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की त्यातून मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय समाजाचा असेल असे वक्तव्य भाजपाचे नेते कृपाशंकर सिंह यांनी आज केले आणि त्यामुळे वादंग सुरू झाला. मात्र, यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळत आहे, असे ध्यानात आल्यावर भाजपाच्या नेत्यांनी सारवासारव करत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कृपाशंकर सिंह ( Kripashankar) यांच्या विधानाला फोडणी देत उत्तर भारतीय असो की मराठी, हिंदू हा हिंदुच असतो असे विधान करून ठाकरे बंधुंवर आगपाखड केली. त्यामुळे वाद आणखी पेटला.
मीरा-भाईंदर येथे आयोजित उत्तर भारतीयांच्या संमेलनात बोलताना माजी मंत्री कृपाशंकर सिंह म्हणाले की, आम्ही इतक्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की त्यामुळे उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवता येईल. महापालिका निवडणुकीत सर्व ठिकाणी महायुतीची सत्ता येईल. 29 महापालिकेत आमचीच सत्ता येईल. फडणवीस यांचा विकासाचा बुलडोझर महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे मतदार महायुतीलाच मतदान करतील. नकली शिवसेना गेली, आता खरी शिवसेना आमच्यासोबत आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबईच नव्हे तर एमएमआरडीए परिसरातील सगळ्याच महापालिकांमध्ये उत्तर भारतीय मतदारांची भूमिका निर्णायक राहणार आहे. मुंबईतील 227 पैकी जवळपास 100 जागांवर उत्तर भारतीय मतांचा प्रभाव आहे. त्यामुळे हे मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी उत्तर भारतीयांना खूश करणारी वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते असलेले कृपाशंकर सिंह हे तर अनेकदा मराठी नेत्यांना डिवचणारी वादग्रस्त विधाने करत असतात. यापूर्वी मार्चमध्ये त्यांनी गंगा नदीचे प्रदूषण आणि कुंभमेळ्यातील अमृतस्नानावरून राज ठाकरेंवर टीका करताना, ते सकाळीच उठून भांग घेतात आणि त्याच मस्तीत राहतात असे म्हटले होते. त्यावरूनही वादही निर्माण झाला होता.
कृपाशंकर सिंह यांच्या महापौरबाबतच्या वक्तव्यानंतर लागलीच त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आमदार सचिन अहिर यांनी कृपाशंकर सिंह यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, यांना सत्तेचा माज आला आहे. त्यांचा हा माज या निवडणुकीत जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. हा मराठी माणसाचा आणि मराठी मातीचा अपमान आहे. तो सहन केला जाणार नाही. तर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी संताप व्यक्त करत म्हटले की, त्यांचे हे वक्तव्य भाजपाच्या महाराष्ट्रातील नेत्यांना मान्य आहे का? त्यांचा पाठिंबा आहे का? यामुळेच राज ठाकरे हे नेहमी सांगत असतात की, मराठी माणसा वेळ गेलेली नाही, आता जागा हो.
दुसरीकडे, कृपाशंकर सिंह यांच्या विधानामुळे विरोधकांना टीकेची आयती संधी मिळत असल्याचे ध्यानात आल्यावर भाजपाच्या नेत्यांनी सारवासारव सुरू केली. भाजपा नेते आ. प्रवीण दरेकर म्हणाले की, मला वाटते की, त्या त्या समाजाचे नेते आपल्या समाजाच्या सभांवेळी असे बोलत असतात. त्यांनी त्यांच्या समाजासाठी तशी इच्छा व्यक्त केली असेल, पण ही पक्षाची भूमिका नाही. त्यांच्याकडे पक्षाने कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी सोपवलेली नाही. मुंबईचा महापौर कोण याचा निर्णय महायुतीचे नेते घेतील.
त्याबाबत बोलण्याचा अधिकार कृपाशंकर सिंह यांना दिलेला नाही. त्यामुळे अशा विधानांना फार महत्त्व देऊ नये. या खुलाशानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मात्र या विषयात कारण नसताना उडी घेतली. त्यांनी यावरून उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावरच आरोप केले. ते म्हणाले की, मराठी मुंबई आता मुस्लीम मुंबई झाली आहे. हे किरीट सोमय्या किंवा अमित शहा म्हणत नाहीत, तर तसा अहवालच आहे. 2030 पर्यंत हिंदुंची संख्या 54 टक्के इतकी कमी होईल, तर मुस्लिमांची संख्या 30 टक्क्यांवरही जाईल. उद्धव ठाकरेंचा सहकारी पक्ष एमआयएम सांगतो की, मुंबईचा महापौर खान, पठाण किवा बुरखेवाली असावी, हे आमचे लक्ष्य आहे. पण त्यावर राज किंवा उद्धव ठाकरे काही बोलत नाहीत. उत्तर भारतीय असो, गुजराती असो, राजस्थानी असो, हिंदू हा हिंदू आहे. उद्धव ठाकरेंना मुंबईवर महापौर नाही, तर माफिया कंत्राटदारांचे नेतृत्व हवे आहे. भाजपाचे लक्ष्य मुंबईचा विकास करणे हे आहे.
आर.आर.सिंह पहिले
उत्तर भारतीय महापौर
मुंबईत उत्तर भारतीय किंवा अमराठी महापौर बसवण्यावरून सध्या वातावरण तापले आहे. परंतु 1993-94 मध्ये काँग्रेसने उत्तर भारतीय नेते आर.आर.सिंह यांना महापौर केले होते. मुंबईचे ते पहिले उत्तर भारतीय महापौर ठरले. 1931 पासून मुंबई महानगरपालिकेच्या अध्यक्षाचे पद बदलून महापौर असे करण्यात आले. तेव्हापासून 94 वर्षांत अनेक अमराठी महापौर झाले आहेत. त्यात सर्वाधिक 12 गुजराती भाषिकांचा समावेश आहे.
——————————————————————————————————————————————————
हे देखील वाचा –
रेल्वे वेळापत्रकात १ जानेवारीपासून मोठा बदल; जाणून घ्या तुमच्या प्रवासाचा अचूक वेळ..









