Home / महाराष्ट्र / Ravikant Tupkar: ‘दोन-चार मंत्र्यांना कापा…’; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान

Ravikant Tupkar: ‘दोन-चार मंत्र्यांना कापा…’; रविकांत तुपकरांचे वादग्रस्त विधान

Ravikant Tupkar: शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली...

By: Team Navakal
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar: शेतकरी कर्जमाफी आणि शेतमालाला योग्य भाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि विविध शेतकरी संघटनांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

बच्चू कडू यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपल्यामुळे नागपूर-हैदराबाद महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला.

या मोर्चात बोलताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर तीव्र आणि आक्रमक शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये. आमदार नव्हे तर दोन-चार मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, असे वादग्रस्त वक्तव्य देखील यावेळी तुपकर यांनी केले.

“शेतकरी त्यांच्या स्वतःच्या चुकांमुळे नाही, तर सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही,” असे तुपकर ठामपणे म्हणाले.

सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी संकटात

तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचे वास्तव मांडले. “सोयाबीनच्या एक क्विंटल उत्पादनासाठी सुमारे 7,500 रुपये खर्च येतो, परंतु बाजारात केवळ 3,500 ते 4,000 रुपये भाव मिळत आहे. कापसाचीही तीच अवस्था आहे. केंद्र सरकारने सोयाबीनची निर्यात न केल्यामुळे आणि कापसाची आयात केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारवर थेट निशाणा

तुपकर यांनी सरकारला थेट आव्हान दिले की, “सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही. राज्यात जातीचा मोर्चा निघाल्यास सरकार आंदोलनाच्या ठिकाणी जाते, मग आमच्या मातीच्या मोर्चाला चर्चेसाठी का येऊ शकत नाही? आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तर तुम्हाला आमच्याकडे चर्चेला यावे लागेल.” माजी आमदार वामन चटप, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला.

आत्महत्या न करण्याचा सल्ला आणि वादग्रस्त वक्तव्य

रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याची भावनिक विनंती केली. “शेतकऱ्यांनो, कितीही संकटं आली तरी जीवन संपवायचं नाही. आम्ही मरायला आलो आहोत, पण असे मरणार नाहीत. बच्चू भाऊंनी आमदारांना कापण्याचा सल्ला दिला, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो की दोन-चार मंत्र्यांना कापा, पण आता मागे हटायचं नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य तुपकर यांनी केले.

तसेच, त्यांनी नागपूरनंतर आंदोलनाचा पुढचा टप्पा मुंबईत ठेवण्याचा इशारा दिला, “त्या नालायकांना आपण बाहेर काढू.” “कर्जमाफी झाल्याशिवाय घरी फोन करून सांगा, माघारी येणार नाही,” असा निर्धार त्यांनी आंदोलकांना करण्यास सांगितले.

हे देखील वाचा – Paytm, PhonePe आणि Google Pay वर UPI AutoPay कसे बंद करावे? स्टेप-बाय-स्टेप संपूर्ण प्रक्रिया

Web Title:
संबंधित बातम्या