Nagpur News : नवी दिल्लीतील ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट’ दरम्यान भारत मंडपम येथे केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत अंगवस्त्र (टी-शर्ट) त्यागून आंदोलन केल्याप्रकरणी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांना अटक करण्यात आली आहे. या अटकेचे आणि चार दिवस उलटूनही त्यांना अद्याप जामीन न मिळाल्याचे तीव्र पडसाद आता नागपुरात उमटले आहेत. या कारवाईचा निषेध नोंदवण्यासाठी नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने स्थानिक भारतीय जनता पक्ष कार्यालयावर धडक देण्याचा प्रयत्न करण्यात आला, ज्यामुळे शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
आंदोलनासाठी शेकडो युवक काँग्रेस कार्यकर्ते ऐतिहासिक टिळक पुतळा परिसरात एकत्र आले होते. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता. लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचा आरोप करत महिला आंदोलकांनी आपल्या तोंडाला काळ्या फिती बांधून त्यावर प्रतिकात्मक कुलूप लावले होते. “मोदी सरकार हाय-हाय” आणि सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. आंदोलक अतिशय आक्रमक पवित्र्यात भाजपा कार्यालयाकडे कूच करत असताना पोलिसांनी चोख बंदोबस्त लावून त्यांना रोखले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये प्रचंड ओढाताण व झटापट झाली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती.
केवळ अटकेचाच निषेध न करता, आंदोलकांनी यावेळी ‘एपस्टीन फाईल्स’चा (Epstein Files) मुद्दाही लावून धरला. या प्रकरणावरून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारला लक्ष्य करत “शेम-शेम” अशा घोषणा दिल्या. या फाईल्समध्ये नाव असल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.










