Home / महाराष्ट्र / India’s First Smart Village: देशातील पहिले स्मार्ट-इंटेलिजेंट गाव महाराष्ट्रात, जाणून घ्या काय आहे खास?

India’s First Smart Village: देशातील पहिले स्मार्ट-इंटेलिजेंट गाव महाराष्ट्रात, जाणून घ्या काय आहे खास?

India's First Smart Village

 India’s First Smart Village: तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे छोटेसे खेडेगाव आता देशातील पहिले ‘स्मार्ट आणि इंटेलिजेंट’ (First Smart and Intelligent Village) गाव बनले आहे. या गावात शेती, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे, ज्यामुळे गावाचा कायापालट झाला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकतेच या ‘स्मार्ट’ गावाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागाच्या डिजिटल परिवर्तनासाठी राज्यात या उपक्रमाची मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

‘गावाचा कायापालट’

या उपक्रमांतर्गत सातनवरी गावात शेतीत ड्रोन आणि सेन्सरचा वापर केला जात आहे. यामुळे माती परीक्षण, फवारणी आणि खत व्यवस्थापन करणे सोपे झाले आहे. यामुळे शेतीचा खर्च कमी झाला असून, उत्पादनातही वाढ झाली आहे.

गावातील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारली असून, टेलीमेडिसिनच्या मदतीने आरोग्य सेवाही उपलब्ध झाल्या आहेत.

“नागपूर जिल्ह्यातील सातनवरी गावात कृषी, आरोग्य, शिक्षण आणि इतर अत्यावश्यक क्षेत्रांमध्ये प्रगत तंत्रज्ञानावर आधारित सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे एक समृद्ध गावाचे मॉडेल तयार झाले आहे,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

राज्यात 3,500 गावांचे होणार ‘स्मार्ट’करण

या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात दहा गावांना ‘स्मार्ट’ आणि ‘इंटेलिजेंट’ बनवले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. एकूण 3,500 गावांना डिजिटल तंत्रज्ञानाने जोडण्याचे उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र सरकार आणि नागपूर जिल्हा प्रशासनाने वॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइजेस (VOICE) आणि 24 भारतीय कंपन्यांच्या सहकार्याने राबवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘भारतनेट’ प्रकल्पाचा आणि महाराष्ट्रातील ‘महानेट’ प्रकल्पाचा उल्लेख करत फडणवीस यांनी म्हटले की, आता भारतीय तंत्रज्ञान कंपन्यांच्या मदतीने गावांमध्ये 18 महत्त्वाच्या सेवा उपलब्ध केल्या जातील.

यामध्ये टेलीमेडिसिनद्वारे आरोग्य सुविधा, एआय-आधारित स्मार्ट शिक्षण, स्मार्ट सिंचन, ड्रोनद्वारे फवारणी, ऑन-व्हील्स बँकिंग सेवा आणि डिजिटल पाळत ठेवणे यांचा समावेश आहे. सातनवरी लवकरच संपूर्ण देशासाठी एक आदर्श गाव बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


हे देखील वाचा –

श्रेयस अय्यरने कर्णधारपदाची ऑफर नाकारली; ‘या’ कारणामुळे घेतला मोठा निर्णय

बाईक रॅलीदरम्यान तरूणाकडून राहुल गांधींना किस करण्याचा प्रयत्न, तेवढ्या सुरक्षा रक्षकाने… व्हिडिओ व्हायरल

’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप