Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र सरकारने राज्यातील बळीराजाला मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण मुंबईतील विधान भवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 89,75,298 शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (DBT) एकूण 1798.78 कोटी रुपयांचा निधी जमा झाला आहे. प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळणारी एकूण रक्कम 1,820 कोटी रुपयांच्या घरात आहे.
बळीराजाला वर्षाला 12 upej रुपयांची मदत
केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेतून शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात. यात महाराष्ट्र सरकारने आपल्या ‘नमो शेतकरी योजने’ची भर घालत आणखी 6,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा प्रकारे राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आता दरवर्षी एकूण 12,000 रुपयांची थेट आर्थिक मदत मिळत आहे. केंद्र सरकारने 13 मार्च 2026 रोजी पीएम किसानचा 22 वा हप्ता दिल्यानंतर, राज्य सरकारनेही तत्परतेने ऑगस्ट 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीसाठीचा हा आठवा हप्ता वितरित केला आहे.
जिल्हानिहाय निधीचे वाटप (प्रमुख जिल्हे)
या हप्त्यांतर्गत राज्यातील विविध जिल्ह्यांना मिळालेला निधी खालीलप्रमाणे आहे:
- अहिल्यानगर: 108.30 कोटी रुपये
- सोलापूर: 97.52 कोटी रुपये
- कोल्हापूर: 92.33 कोटी रुपये
- सातारा: 87.07 कोटी रुपये
- पुणे: 85.24 कोटी रुपये
- नाशिक: 83.86 कोटी रुपये
- जळगाव: 77.40 कोटी रुपये
- नांदेड: 76.50 कोटी रुपये
- सांगली: 75.49 कोटी रुपये
- बीड: 72.70 कोटी रुपये
(इतर जिल्ह्यांमध्येही त्यांच्या शेतकरी संख्येनुसार 14 कोटी ते 68 कोटी रुपयांपर्यंतचा निधी वितरित करण्यात आला आहे.)
योजनेची आतापर्यंतची घोडदौड
24 मार्च 2026 पर्यंत या योजनेच्या 1 ते 7 हप्त्यांमध्ये एकूण 13017.30 कोटी रुपये 93.08 लाख शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. या आर्थिक मदतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असून, शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बियाणे, खते आणि इतर खर्चासाठी मोठा आधार मिळणार आहे.










