Home / महाराष्ट्र / Nanded Crime News: सत्तेच्या हव्यासापोटी पोटच्या लेकीचा बळी! निवडणूक लढवण्यासाठी बापाने चिमुकलीला कालव्यात ढकलले

Nanded Crime News: सत्तेच्या हव्यासापोटी पोटच्या लेकीचा बळी! निवडणूक लढवण्यासाठी बापाने चिमुकलीला कालव्यात ढकलले

राजकारणाची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा एक अत्यंत भयानक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत...

By: Team Navakal
Nanded Crime News
Social + WhatsApp CTA

राजकारणाची हाव माणसाला किती क्रूर बनवू शकते, याचा एक अत्यंत भयानक प्रकार नांदेड जिल्ह्यात उघडकीस आला आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी अपात्र ठरू नये, या कारणास्तव एका निर्दयी पित्याने स्वतःच्या ६ वर्षांच्या मुलीची हत्या केली. महाराष्ट्र पंचायत राज कायद्यातील ‘दोन अपत्यांच्या’ नियमात बसण्यासाठी या पित्याने आपल्या मुलीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

नेमके प्रकरण काय?

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील केरूर गावातील पांडुरंग कोंडमंगले हा तरुण गावात सलून चालवतो. पांडुरंगला तीन अपत्ये आहेत, ज्यात एक ३ वर्षांचा मुलगा आणि ६ वर्षांच्या दोन जुळ्या मुलींचा समावेश आहे. पांडुरंगला आगामी निवडणुकीत गावचा सरपंच होण्याची इच्छा होती. मात्र, महाराष्ट्रातील निवडणूक नियमांनुसार, ज्यांना दोनपेक्षा जास्त मुले आहेत, अशी व्यक्ती निवडणूक लढवू शकत नाही. आपल्याला तीन मुले असल्याने आपण बाद होऊ, ही भीती त्याला सतावत होती.

सरपंचासोबत मिळून रचला कट

या समस्येतून वाचण्यासाठी पांडुरंगने गावाचा विद्यमान सरपंच गणेश शिंदे याची मदत घेतली. दोघांनीही कागदोपत्री मुलांची संख्या कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सुरुवातीला एका मुलीला दत्तक देण्याचा विचार झाला, तर कधी कागदपत्रात फेरफार करण्यासाठी त्याने पुणे महापालिकेपर्यंत धाव घेतली. मात्र, जन्म दाखल्यावर नोंद असल्याने कायदेशीररीत्या मुलांची संख्या कमी करणे अशक्य असल्याचे त्याच्या लक्षात आले. अखेर, पोटच्या मुलीची हत्या करून तो अपघात असल्याचे भासवण्याचा कट या दोघांनी रचला.

लेकीला तेलंगणात नेऊन कालव्यात ढकलले

ठरल्याप्रमाणे, पांडुरंग आपली ६ वर्षांची मुलगी प्राची हिला दुचाकीवरून तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यात घेऊन गेला. तिथे निजामसागर कालव्यापाशी पोहोचल्यावर त्याने निर्दयीपणे प्राचीला वाहत्या पाण्यात ढकलून दिले. परिसरातील मजुरांना आवाज आल्याने त्यांनी धाव घेतली, मात्र तोपर्यंत चिमुकलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता.

असा झाला गुन्ह्याचा पर्दाफाश

तेलंगणा पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तिचे फोटो प्रसिद्ध केले. सोशल मीडियावरील या फोटोंवरून मुलीची ओळख पटली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत नांदेड गाठले. सुरुवातीला पांडुरंगने पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. या प्रकरणी पोलिसांनी पांडुरंग कोंडमंगले आणि त्याला मदत करणारा सरपंच गणेश शिंदे या दोघांवरही हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

काय सांगतो निवडणूक नियम?

महाराष्ट्र विधीमंडळाने 2005 मध्ये केलेल्या कायद्यानुसार, ज्या व्यक्तीला 12 सप्टेंबर 2001 नंतर दोनपेक्षा जास्त मुले आहेत, ती व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका) निवडणुका लढवण्यास अपात्र ठरते. विशेष म्हणजे, स्वतःची मुले असताना एखादे मूल दुसऱ्याला दत्तक दिले, तरी कागदोपत्री मूळ पालकांच्या मुलांची संख्या कमी होत नाही आणि ते उमेदवार अपात्रच ठरतात.

Web Title:
For more updates: , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या