‘उद्धव-राज एकत्र आले तर…’,ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर नारायण राणेंचे वक्तव्य चर्चेत

Narayan Rane on Uddhav -Raj Thackeray Alliance

Narayan Rane on Uddhav -Raj Thackeray Alliance | राज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य राजकीय युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. दोन्ही पक्षांच्या गोटातून यावर अधिकृत वक्तव्य न आल्याचं जरी चित्र असलं, तरी “सकारात्मक संकेत” दिले जात आहेत. यावरूनच भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली असून, या ठाकरे बंधूंनी एकत्र आले तरी फारसा फरक पडणार नसल्याचं परखड मत त्यांनी मांडलं आहे.

“कोणाशी युती करताना ताकद पाहावी लागते. आमच्याकडे 134 आमदार, अजित पवारांकडे 41 आणि शिंदे गटाकडे 52 आमदार आहेत. ही सगळी ताकद 200 च्या जवळ गेलीय. मग उद्धव आणि राज ठाकरेंना काय फायदा होणार?” असा सवाल करत राणेंनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला.

ते पुढे म्हणाले की“भाजपाचा पूर आला आहे. या पूरात कोणीही वाहून जाईल. हा पूर लोकांना त्रास देणारा नाही, उलट लोकांच्या फायद्याचाच आहे. जे काही बाळासाहेबांनी निर्माण केलं होतं, त्याचाच वापर करत हे टिकून आहेत. आता ही ताकद घटतच चालली आहे. पुढच्या निवडणुकीत पाचच आमदार निवडून येतील.”

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीवरही राणेंनी टीका केली. “या दोघांनी परदेशात गुंतवणूक केली आहे. सामना पेपर करोनाकाळात फायद्यात होता, तर बाकीची सगळी मीडिया तोट्यात होती. यांचं उत्पन्न, कंपन्या आणि लाभ सगळं तपासलं पाहिजे. शिवाय उद्धव ठाकरे यांनी आता मोदी, अमित शाह यांचा उल्लेखही करू नये,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

तसेच, राज-उद्धव युती झाल्यावर काही चमत्कार होईल का? असा प्रश्न उपस्थित करत राणे म्हणाले, “दोघे एकत्र आले की वीज चमकणार आहे का? काय जादू आहे त्यांच्याकडे? मराठी माणसाचं काय केलं त्यांनी? शिवसेना म्हणते हिंदूत्व, पण मुख्यमंत्री असताना राहुल गांधींसोबत बसताना सावरकरांवरच्या टीकेवर एक शब्दही काढला नाही.”

त्यांनी दोघांची ताकद तपासून पाहण्याचं आव्हान दिलं, “एकाकडे 0 आमदार आहेत, दुसऱ्याकडे 20. मिळून किती होतात? हा प्रकार म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवायचा प्रयत्न आहे. हा फॉर्म्युला फेल होईल.”, अशा शब्दात त्यांनी जोरदार टीका केली.