–तुळशीदास भोईटे
Naresh Mhaske: खासदार नरेश म्हस्के यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी बोलताना दिवंगत अनंत तरेंविषयी नको ते बोलले आणि शिंदेंची शिवसेना अडचणीत आली आहे. कोळी समाजातील असणाऱ्या तरेंसारख्या दिवंगत नेत्याबद्दल म्हस्के यांनी काढलेले उद्गार कोळीवाडे असलेल्या महापालिकांमध्ये, जिल्ह्यांमध्ये त्यांच्या पक्षासाठी अडचणीचं ठरण्याची शक्यता आहे.
तरेंच्या कुटुंबीयांनी खासदार म्हस्केंना तोंड आवरा नाही तर, अद्दल घडवण्याचा जाहीर इशारा दिला आहे. मात्र, इथंच हा वाद संपणार नसून त्याचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टवरील पालघर, ठाणे, मुंबई शहर, उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांमध्ये कोळी समाजाचे नागरिक आहेत. या जिल्ह्यांमधील कोळीवाडे आजही आपलं पारंपरिक स्थान टिकवून आहेत. केवळ मच्छिमारीचा व्यवसायातूनच नाही, तर उत्सव, पारंपरिक संगीत, नृत्य यामुळेही कोळी समाजाचं एक वेगळं महत्व आहे.
निवडणुकीच्या राजकारणात कोळी समाजाच्या मतंही प्रभावशाली ठरतात. पाच जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांमध्येच नाही तर मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीराभाईंदर, विरार-वसई या आणि अन्य महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्येही कोळी मतांचं महत्व आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ३१ जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता असलेल्या निवडणुकांची तयारी सुरु होत असतानाच खासदार नरेश म्हस्के यांनी दिवंगत अनंत तरेंविषयी काढलेले उद्गार शिंदेंच्या शिवसेनेला बाधक ठरू शकतात.
आगामी निवडणुकांमध्ये तरेंच्या अपमानाचा मुद्दा शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात आक्रमकतेने वापरला जाईल, असे संकेत महेश्वरी तरे, संजय तरे यांची खासदार म्हस्केंविरोधातील आक्रमकतेतून मिळाल्याचं मानलं जातं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या शिफारशीने महापौरपदासाठी तीनवेळा अनंत तरेंना संधी दिली, उपनेतेपद दिलं.
रायगड लोकसभा मतदारसंघात त्यावेळचे बलाढ्य नेते ए आर अंतुले यांच्याविरोधात लढण्याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनंत तरेंवर सोपवली होती. ते लढले, याची आठवणही महेश्वरी तरे यांनी करून दिली. एकूणच धर्मवीर आनंद दिघेंच्या डोक्यावर बसवण्यासाठी दिवंगत अनंत तरेंना उपनेतेपद दिल्याचं विधान नरेश म्हस्केंच्या अंगलट आलं असतानाच त्यांच्या पक्षालाही फटका बसण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा –
धनखड यांचा शासकीय घरात जीव गुदमरत होता; अभयसिंह चौटाला यांचा दावा