Nashik Crime : नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच आता महिलांवरील अत्याचार आणि अश्लील व्हिडिओंशी संबंधित आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात स्वतःला पीडित भासवून पुढे आलेला तक्रारदार रवींद्र एरंडे हाच या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. एनजीओ संचालक व तथाकथित पत्रकार म्हणवणार्या एरंडेकडे सव्वाशेहून अधिक महिलांचे खासगी व्हिडिओ सापडल्याने या प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांनी एरंडेविरोधात लैंगिक शोषण, माहिती तंत्रज्ञान कायदा आणि अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या नवीन खरातमुळे नाशिकमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे.
नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्यात 2 एप्रिल रोजी 63 वर्षीय रवींद्र गणपत एरंडे याने त्यांच्या कार्यालयातील टॅब चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली होती. त्या टॅबमध्ये वैयक्तिक स्वरूपाचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे त्याने सांगितले. अज्ञात व्यक्तींनी हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत 12 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोपही त्याने केला होता. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी सापळा रचला आणि 10 हजार रुपये स्वीकारताना चार संशयितांना रंगेहाथ पकडले. यात आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश रामदास पानपाटील, सूरज सुनील गवई आणि श्रीपत भीमराव शिंदे यांचा समावेश होता. त्यांच्या ताब्यातून टॅब, मोबाईल फोन, पेन ड्राईव्ह आणि मेमरी कार्ड जप्त करण्यात आली. अटक आरोपींकडून जप्त केलेल्या या सर्व डिजिटल उपकरणांची तपासणी केली असता पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. एक टॅब, 4 मोबाईल, 2 पेन ड्राईव्ह, 1 मेमरी कार्ड या साधनांमध्ये 100 हून अधिक महिलांचे खासगी आणि अश्लील व्हिडिओ आढळले. केवळ टॅबमध्येच 87 व्हिडिओ सापडल्याने खळबळ उडाली. या व्हिडिओंत तक्रारदार एरंडे स्वतः विविध महिलांसोबत दिसत होता. एरंडेचे कारनामे उघड झाल्यानंतर या प्रकरणात एका पीडित महिलेने सातपूर पोलिसांशी संपर्क साधून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून, तसेच तिच्या जातीचा गैरफायदा घेत नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेलमध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप महिलेने केला.
एरंडे सातपूर भागातील कामगारनगर व श्रमिकनगरमध्ये कधी पत्रकार, कधी हस्तरेषातज्ज्ञ तर कधी लघुउद्योग कन्सल्टंट म्हणून वावरायचा. लघुउद्योग सुरू करून देण्याच्या बहाण्याने त्याने 2003 पासून 2024 दरम्यान अनेक गोरगरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यांच्या हतबलतेचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केले आणि आपल्या सातपूर कॉलनी परिसरातील नीळकंठेश्वरनगर येथील कार्यालयाच्या केबिनमध्ये ‘कॅमेरा द्वारे छुपे चित्रीकरण केले. हे अश्लील व्हिडिओ त्याने टॅब आणि हार्डडिस्कमध्ये थेट पीडित महिलांच्या नावे ‘फोल्डर’ करूनसेव्ह केले.
रवींद्र एरंडेवर अश्लील व्हिडिओ ‘ब्लू फिल्म’ स्वरूपात व्हिडिओ विक्रीचा ही संशय आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे पैशांची मागणी झाली का, याबाबतही पोलिसांचा तपास सुरू आहे. पीडितांमध्ये अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, कंपनी कामगार, घरकाम करणार्या महिलांचा समावेश आहे. एरंडेवर बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात नाशिक झोन-2 पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पीडित महिलांनी न घाबरता पुढे येण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, हार्ड डिस्कमधून पन्नासहून अधिक व्हिडिओ हस्तगत केले आहेत.
ज्या महिला संशयिताच्या शोषणाला बळी पडल्या आहेत त्यांनी न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. पीडित महिलांची ओळख पोलीस पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. याप्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल.
ऑफिसबॉयमुळेच सुगावा
अशोक खरात याच्या ऑफिसमधील ऑफिसबॉयने त्याचे महिलांसोबतचे व्हिडिओ सार्वजनिक करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. एरंडे याच्या बाबतीतही त्याच्या ऑफिसमध्ये काम करणार्या आकाश बकरे या ऑफिसबॉयनेच त्याला अडचणीत आणले. त्याने 1 एप्रिल रोजी संधी साधून केबिनमधून एरंडेचा टॅब आणि हार्ड डिस्क चोरली. त्यानंतर त्यातील अश्लील व्हिडिओ उघड करण्याची भीती दाखवून आकाशने आपल्या तीन मित्रांच्या मदतीने एरंडेला धमकावण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल न करण्यासाठी 12 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी त्याने एरंडेकडे केली. भीतीपोटी एरंडेने सुरुवातीला त्याला 10 हजार रुपये दिले. मात्र, सततची पैशांची मागणी आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून एरंडेने 2 एप्रिल रोजी सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्याने स्वतःचे कृत्य लपवून फक्त टॅब व हार्ड डिस्क चोरी आणि खंडणीची फिर्याद नोंदवली. पोलिसांनी जप्त केलेली हार्ड डिस्क आणि पेन ड्राइव्ह आता विश्लेषणासाठी पाठवले आहेत. या अहवालानंतर एरंडेवर लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.










