Nashik Crime News : नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री येथील माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संजय सदू नडगे असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच ही दुर्दैवी घटना घडल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संजयचा मृतदेह शाळेपासून काही अंतरावर असलेल्या डोंगराळ भागातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.
वाढदिवसाच्या दिवशीच पलायन-
मिळालेल्या माहितीनुसार, संजय नडगे हा मूळचा गुजरात सीमेजवळ असलेल्या बुरूडपाडा गावचा रहिवासी होता. त्याचे आई-वडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे आणि पालकांच्या कामानिमित्त होणाऱ्या स्थलांतरामुळे संजय पिंप्री येथील शासकीय अनुदानित आश्रमशाळेत निवासी विद्यार्थी म्हणून शिक्षण घेत होता. विशेष म्हणजे, १२ मार्च २००९ ही त्याची जन्मतारीख होती. गुरुवारी (दि. १२ मार्च) त्याचा वाढदिवस असतानाच दुपारी ३ वाजेच्या सुमारास तो कोणालाही काहीही न सांगता आश्रमशाळेतून निघून गेला. तो बराच वेळ परतला नसल्याने शाळा प्रशासनाने त्याची शोधाशोध केली, मात्र त्याचा पत्ता लागला नाही.
तक्रार आणि शोधमोहीम-
विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक सुनील विठ्ठल जाधव यांनी शुक्रवारी (दि. १३) त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरू केला होता. दरम्यान, संजयचे कुटुंबीय देखील त्याचा शोध घेत होते. दोन दिवस उलटल्यानंतरही संजयचा शोध लागत नव्हता, अखेर रविवारी (दि. १५) दुपारी आश्रमशाळेच्या मागील बाजूस सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगराळ भागात गुरे चरण्यासाठी गेलेल्या मुलांना एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.
पोलीस तपास आणि उपस्थित झालेले प्रश्न-
घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अशोक बोडके यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संजयने हे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, या घटनेमुळे आश्रमशाळेच्या सुरक्षेवर आणि कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्याने असे पाऊल का उचलले? तो स्वतःहून शाळेबाहेर गेला की त्यामागे अन्य काही कारण होते? तसेच, विद्यार्थी शाळेच्या आवाराबाहेर जाताना प्रशासनाचे लक्ष का नव्हते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. संजयच्या पश्चात आई-वडील आणि दोन भाऊ असा परिवार असून, त्याचे दोन्ही भाऊ देखील त्याच आश्रमशाळेत शिकत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास त्र्यंबकेश्वर पोलीस करत आहेत.










