Nashik Kumbh Mela : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि स्तुत्य निर्णय घेतला आहे. या जागतिक स्तरावरील सोहळ्यात प्रशासनाला विविध सेवांमध्ये मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन शैक्षणिक श्रेयांक (Credits) प्रदान करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय लागू असून, येत्या काही दिवसांत या प्रक्रियेला अधिकृत आणि अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
कुंभमेळा २०२६-२७ आणि विद्यार्थ्यांची भूमिका-
नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो एक भव्य सांस्कृतिक उत्सव असतो. २०२६-२७ दरम्यान होणाऱ्या या महोत्सवासाठी जगभरातून कोट्यवधी भाविक येण्याची शक्यता आहे. अशा वेळी प्रशासनावर प्रचंड ताण असतो. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक नियंत्रण, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन, गर्दीचे नियंत्रण, सीसीटीव्ही सर्वेक्षण, पर्यावरण संवर्धन आणि संशोधनात्मक कार्य अशा विविध क्षेत्रांत विद्यार्थी आपले योगदान देऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या या सक्रिय सहभागामुळे प्रशासनाला हक्काचे आणि सुशिक्षित सहायक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सागर वैद्य यांनी या संदर्भातील प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी आणि प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेने याला तत्त्वतः मान्यता दिली आहे. यापूर्वीच्या कुंभमेळ्यांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी केवळ स्वयंसेवक म्हणून काम केले होते; परंतु आता त्यांच्या या श्रमाचे चीज व्हावे, या उद्देशाने त्यांना ‘ओपन इलेक्टिव्ह क्रेडिट’ अंतर्गत श्रेयांक देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
डॉ. पराग काळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना हे दोन श्रेयांक मिळवण्यासाठी कुंभमेळ्याच्या नियोजित कामांमध्ये किमान ६० तास योगदान देणे अनिवार्य असेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार कामाचे स्वरूप निवडता येईल. काम पूर्ण केल्यानंतर विद्यापीठाचे श्रेयांक मिळण्यासोबतच प्रशासनाकडून त्यांना अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना व्यवस्थापकीय कौशल्यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि हा त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीतील एक ‘अनोखा शैक्षणिक उपक्रम’ ठरेल.
पुढील नियोजनाची दिशा या संदर्भात कुंभमेळा प्रशासन आणि पोलीस यंत्रणेशी विद्यापीठाच्या दोन प्राथमिक बैठका संपन्न झाल्या आहेत. आता या उपक्रमाचे नेमके स्वरूप निश्चित करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आयोजित करण्याच्या सूचना अधिष्ठात्यांना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची ओढ निर्माण होण्यासोबतच त्यांना प्रशासकीय कामाचा व्यासंग आणि अनुभवही गाठीशी बांधता येणार आहे.









