Nashik Mayor Post Election : नाशिक महापालिकेच्या महापौरपदाचा चेहरा ३ फेब्रुवारी रोजी स्पष्ट होणार आहे. महापौरपदासाठी ६ फेब्रुवारीला निवडणूक होणार असली तरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशीच चित्र स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दुपारी २ वाजेपर्यंत आहे.
महापौरपदासाठी अर्ज प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकाही इच्छुक नगरसेविकेने अर्ज दाखल केला नाही. भाजपकडे महापालिकेत स्पष्ट बहुमत असून पक्षाच्या १६ महिला नगरसेविका महापौरपदासाठी पात्र आहेत. मात्र, सध्या तीन नावांची सर्वाधिक चर्चा असून अंतिम निर्णय वरिष्ठ पक्षनेत्यांच्या पसंतीवर अवलंबून आहे.
भाजपमध्ये महापौरपदासाठी महिलांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. एकापेक्षा अधिक इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यास प्रत्यक्ष निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षाने ठरवलेल्या उमेदवाराच्या समर्थनार्थ भाजप गटनेत्याकडून व्हिप जारी केला जाणार आहे.
व्हिप बजावूनही एखाद्या नगरसेविकेने निवडणूक लढवली, तर तिचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते, असा इशाराही पक्षाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी कोण अर्ज दाखल करतो आणि किती अर्ज येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.











