Navakal Valentine Day Special 2026 : आज जगभरात ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमाचा उत्सव म्हणून साजरा केला जात असला, तरी भारतीय संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यात या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. भारतीय विचारधारेत प्रेम ही केवळ एका दिवसाची भावना नसून, ती आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने संयमाने प्रवास करण्याची एक निरंतर साधना मानली जाते. परंतु, आधुनिकतेच्या प्रवाहात आणि बदलत्या सामाजिक चौकटीत आज अनेक नात्यांमधील तो नैसर्गिक जिव्हाळा हरवत चालल्याचे चित्र दिसत आहे. कौटुंबिक स्तरावर निर्माण झालेली ही दरी सांधण्यासाठी ‘नवाकाळ’ने एक विशेष उपक्रम हाती घेतला होता, दोन पिढ्यांमधील संवाद पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे.
याच संवेदनशील विषयावर ‘नवाकाळ’ने समाजातील विविध स्तरांतून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. “आई-वडील खरोखरच त्रासदायक वाटू लागले आहेत का?” या प्रश्नावर आलेल्या निवडक आणि विचारप्रवृत्त करणाऱ्या प्रतिक्रिया येथे मांडण्यात आल्या आहेत. केवळ ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यापेक्षा, आपल्या घरातील ज्येष्ठांशी आणि मुलांशी मनमोकळा संवाद साधून दोन पिढ्यांनी पुन्हा एकमेकांच्या जवळ यावे, हाच या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. नात्यांमधील हा दुरावा संपवून पुन्हा एकदा ‘कुटुंब’ ही संकल्पना घट्ट व्हावी, यासाठी हा एक छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.
अति हस्तक्षेप की काळजी? बदलत्या काळातील नाते
आज अनेक तरुणांना असे वाटणे चुकीचे नाही की पालकांचा अति हस्तक्षेप त्यांच्या आयुष्यात डोकेदुखी ठरत आहे.
करिअर, लग्न, मुले, जीवनशैली प्रत्येक विषयात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य कमी केले जाते. पालकांचा उद्देश वाईट नसतो पण सततचा दबाव तरुणांना मानसिक थकवा देतो.
आजचे जग पालकांच्या काळासारखे सुरक्षित आणि सरळ राहिलेले नाही. जोखीम घेतल्याशिवाय आज प्रगती शक्य नाही हे वास्तव तरुण अनुभवत आहेत. तरीही पालक अपयशाची भीती मुलांवर लादतात. लग्नासारखा वैयक्तिक निर्णयही अनेकदा सामाजिक अपेक्षांचा विषय बनतो.
प्रत्येक ओळखीत नातेसंबंध शोधणे तरुणांना अस्वस्थ करते.
स्वतःचं आयुष्य जगताना सतत स्पष्टीकरण द्यावे लागणे वेदनादायक ठरते. मुलांनी गप्प राहावे आणि पालकांनी आदेश द्यावेत, ही नात्यांची योग्य पद्धत नाही.
पालकांनी हे स्वीकारायला हवे की काळ बदलला आहे.
अनुभव महत्त्वाचा आहे, पण तो बंधनकारक नसावा.
तरुणांना चूक करण्याचा आणि त्यातून शिकण्याचा अधिकार आहे. नियंत्रणामुळे नाही, तर विश्वासामुळे नाती टिकतात.
डोकेदुखी कमी करायची असेल, तर संवाद आणि समजूत हाच एकमेव मार्ग आहे.
– गिरीश दाभोळकर

मुलांवर लक्ष ठेवा पण बंधने नको
आज कालच्या मुलांना आई आणि वडील त्रास दायक वाटण्याचे कारण मुलांनी त्यांच्या सांगण्याप्रमाने वागायला पाहिजे. पालकांनी पण मुलांना चांगल्या गोष्टी बद्दल टोकु नये कॉलेज मध्ये मुलांना ज्या विषया मध्ये आवड तोच विषय त्याला निवडु दया मुलांना त्याचे करिअर घडू द्या. पण पालकांनी आपल्या मुलांवर त्याच्या नकळत लक्ष ठेवायला पाहिजे तो रात्री उशिरा घरी येतो का?कुठे जातो मुलांची वाईट संगत आहे का? यावर लक्ष दिले पाहिजे. प्रामुख्याने आईने त्याच्या वाईट सवयीना सहकार्य करू नये. कारण आपल्या मुलांचे वाईट किंवा चांगले गुण वडीलांपेक्षा जास्त आईला माहित असतात. अपत्याला आठवड्यातुन एकदा तरी त्याच्या मनाप्रमाणे खाऊ दया. मुलांना नोकरीत किंवा व्यवसाय रस असेल तर त्याला प्रोत्साहन दया आणि त्याचे करिअर त्याला निवडू दया. जेव्हा ते नोकरी किंवा व्यवसायात यशस्वी होऊन आपल्या पायावर उभे राहिल्यावरच लग्नाचा विचार करा यालाच म्हणतात आई वडीलांची पुण्याई.
– रमजान तांबोळी

कुटुंबात सुसंवाद असावा
“छोटे कुटुंब सुखी कुटुंब” या आकर्षक वाक्याची भुरळ पडल्यापासून घरातील मुलाची संख्या एकावर आली. आपल्याला न मिळालेली सारी सुखे आपल्या मुलाला/मुलीला मिळावी, आपण गाठू न शकलेली ध्येयेही त्यांनी गाठावी अशी आताच्या पालकांची धारणा झाली आहे. पाश्चिमात्य संस्कृतीचे भयंकर आकर्षण वाटू लागलेल्या आजच्या तरूण पिढीला आपले आईवडील हे जुन्या कालबाह्य विचारांचे व आपल्यावर जोर जबरदस्ती करणारे,मते लादणारे,मत स्वातंत्र्यावर /व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणार हिटलर आहेत अशी समजूत झाल्याने ते त्रासदायक वाटू लागले आहेत. तर पालकांना पाल्य असमंजस, बेजबाबदार वाटत आहेत. हे असे होण्याचे कारण म्हणजे पाल्य आणि पालकांमध्ये कमी किंवा बंद झालेला सुसंवाद होय. समाजात घडणाऱ्या भल्या बुऱ्या घटनांवर कुटुंबात चर्चा होणे गरजेचे आहे.पण तशी चर्चा / वाद संवाद आता घडत नसल्याने एका घरात राहूनही एक दुसऱ्याचे मन जाणणे कठीण झाले आहे.हे सगळे टाळण्यासाठी घरातील व्यक्तींचा एक दुसऱ्या सोबत सुसंवाद घडला पाहिजे असे वाटते.
– मनमोहन रो.रोगे, ठाणे

कुटुंबातील दरीवर संवाद सेतू आवश्यक
आजच्या पिढीला पालक अनेकदा त्रासदायक वाटतात कारण मूल्य, जीवनशैली आणि संवादाच्या पद्धतीमध्ये दरी वाढली आहे. तंत्रज्ञानात झपाटयाने होणाऱ्या बदलांमुळे विचारसरणीत फरक निर्माण झाला आहे. पालक अनुभवावर विश्वास ठेवतात तर मुले डिजीटल माहीतीकडे झुकतात. अति व्यस्त जीवन शैली आणि सतत मोबाईल वापरामुळे घरातील अर्थपूर्ण संवाद कमी झाला आहे. तरुणांना पालकांचे मार्गदर्शन हे काळजी न वाटता त्यांच्या जीवनात केलेला हस्तक्षेप वाटतो. दुसरीकडे पालकांना भावनिक नाते आणि अधिकार गमावण्याची भिती वाटते. स्वावलंबनाचा सामाजिक दबाव मुलांना सल्ला व शिस्त नाकारायला प्रवृत करतो.
आर्थिक ताणतणाव आणि स्पर्धात्मक वातावरणामुळे कुटुंबातील तणाव वाढतो.करिअर. नातेसंबध आणि सामाजिक मूल्ये, पिढयांमधील फरक गैरसमज वाढवतात.
दोन्ही बाजूंनी संयमाचा अभाव लहान वाद मोठ्या संघर्षात बदलतो.पालक जुनाट वाटतात तर मुले उद्धट वाटतात.
ही भावना द्वेषातून नव्हे तर संवादाच्या अभावातुन निर्माण होते. परस्पर समजूतदारपणा आणि खुला संवाद ही दरी कमी करू शकतो.पालकांनी बदल स्विकारणे व मुलांनी ऐकणे गरजेचे आहे. परस्पर आदर असेल तेव्हाच कुटुंब मजबूत राहते.
– तुकाराम भगत, मुंबई

जन्म देणे पुरेसे नाही संगोपन महत्वाचे
आई हे घराचे मांगल्य तर वडील अस्तित्व असते. आई वडील या अक्षरात श्रुतिस्मृती व सारी महाकाव्ये आहेत. केवळ मुलांना जन्म देऊन कुणी आई वडील होत नाही. तर मुलांचे सर्वांगाने पालनपोषण करूनच ते आई वडील होतात. आज काळ बदलला तसे यांत्रिकीकरणाच्या मोहजाळ्यात आईच्या मांडीची जागा पाच जीबीच्या मोबाईलने घेतली. वडिलांची जागा पगाराच्या पॅकेजनी घेतली. कोणते शिक्षण घ्यावे याबद्दल वडिलांचा आग्रह एक वेळ मान्य नसेल तर मुलांनी त्यांच्या इच्छेनुसार स्वतःची दिशा ठरवावी. पण शिक्षण, व्यवसाय, नोकरी मनासारखे मिळाल्यावर मुलांना विवाह करण्यासाठी सतत पाठपुरावा करणारा आईवडिलांचा ससेमिरा चुकीचा नाही. विवाह केल्यानंतर घरात एखादे दुडदुडणारे मूल यावे यासाठी सतत मागे लागणारे आईवडील शत्रू नसून भावी जीवनात मुलांना एकमेकांचा आधार मिळावा यासाठी त्यांची धडपड असते. कदाचित तरुण रक्ताला ते त्रासदायक वाटेल पण त्यांच्या सुखी व आनंदी जीवनाची आईवडिलांनी दिलेली ती शिदोरी आहे. तेव्हा आजच्या तरुण पिढीला एकच सांगणे, तुम्ही पुढे चालत राहा पण कधीतरी वेळ मिळाला तर मागे वळून बघा. तुमच्या पाठीमागे दिसणारी सावली म्हणजेच आई वडील आहेत हे ध्यानी असूदे.
-सूर्यकांत भोसले मुलुंड (पूर्व) मुंबई

आई-वडिलांचा आम्हाला आधारच वाटतो.
आई वडील आम्हाला त्रासदायक वाटत नाही. आम्हाला ज्या शाखेत जायचे असेल त्या शाखेची संपूर्ण माहिती ते आम्हाला सांगतात. लोकांनी आम्हाला हुशार व साधा मुलगा, एक मार्गी आहे असे म्हणावे असे त्यांच्या सांगण्यावरून कळू लागले आहे. जी शाखा आम्ही निवडली असेल त्या शाखेत मनापासून अभ्यास करून चांगले मार्क मिळवे हीच त्यांची इच्छा असते. क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये आम्हाला काही अडचण आली तर ते आमच्या बरोबर येऊन आमची अडचण दूर करतात. आई-वडिलांच्या सांगण्यावर विश्वास ठेवल्यामुळे आपल्या आयुष्य आनंदात व चांगले जाणार आहे ही गोष्ट आमच्या लक्षात आली आहे.अशा आई-वडिलांचा आम्हाला आधारच वाटतो.
-नीला गोपाळ परांजपे
वय वर्ष ९६

आई वडिलांच्या प्रेमात मालकी हक्काची सावली
आपण जन्माला घातले आहे. त्यामुळे मालकी हक्क असल्याप्रमाणे आई वडील वागवतात. थोर भारतीय संस्कृती, परंपरा आपल्या आई-वडिलांना अनेक गोष्टी आपल्यावर लादण्यासाठी पूरक आहेत. त्यांनी आपल्यावर केलेला खर्च, आपल्यासाठी खाल्लेल्या खस्ता, सगळं आयुष्य फक्त आपल्याचभोवती फिरत असल्यामुळे मुलांच्या आयुष्यातल्या प्रत्येक महत्त्वाच्या वळणावर त्यांना निर्णय घ्यायचा असतो. जो चुकीचा नसला तरीही त्यात अनेकदा मुलांवर अन्याय होत असतो. आपण स्वावलंबी व्हावे स्वतंत्र राहाव, दुसऱ्या शहरात जाऊन शिकावे ही भावना निर्माण होण्यामागे आई-वडिलांचा होणारा त्रास आहे.
-शुभांगी खेलूकर – पुणे

नाण्याच्या दोन बाजू! प्रत्येक पिढीने आत्मपरीक्षण करावे
आई-वडिलांचा व्यवसाय मुलाने पुढे नेला, लहान वयापासून त्यात मेहनत घेतली, स्वतः निर्व्यसनी राहिला, चुकीच्या संगतीत गेला नाही, दंगा-मस्ती केली नाही,मुलींच्या मागे फिरला नाही. पोलिस केस होईल असे वागला नाही, घरच्यांच्या डोक्याला ताप दिला नाही. जे काही कमावले तेही आई-वडिलांच्या स्वाधीन केले. पण अनेकदा असे होते की मुलगा ४२ वर्षांचा झाल्यावर आणि आई-वडील ६५-७० वर्षांचे झाल्यावर, ते मुलाला त्याच्या बायको-मुलांसमोर बोलून दाखवतात की, “आमच्या दुकानामुळे तुम्ही आज जगत आहात.” हे बोलणे मनाला लागते. कारण त्या व्यवसायात मुलानेही १५व्या वर्षापासून कष्ट केलेले असतात.
जर मुलाने हे सांगितले तर उत्तर येते “हे आमचे नशीब, आमचे पुण्यकर्म. देवाने सर्व केले. मग आई वडील नकोसे वाटतात. नाण्याच्या दोन्ही बाजू असतात, पण समाज अनेकदा एकच बाजू पाहतो. वृद्ध पालक आपली बाजू मांडतात; “आम्ही वृद्ध आहोत” हे भांडवल करतात. पण त्यांच्या तरुणपणी त्यांनी स्वतःच्या वृद्ध आई-वडिलांची कशी सेवा केली, याचाही विचार व्हायला हवा. याबाबत ८० टक्के वृद्ध पालक काही तरी अडचणींचा दाखला देत आपले अंग काढून घेतील ही वस्तू स्थिती आहे.पण मुलांनी आपल्याला जपावे ही त्यांची अपेक्षा असते.म्हणून वृद्ध पालकांना नम्र विनंती आहे की, आधी स्वतःचा भूतकाळ तपासा, आणि मग मुलांकडून अपेक्षा ठेवा.

आई-वडील त्रासदायक नाहीत
आई वडील त्रासदायक नाही कारण आताची इंटरनेट व मोबाईल मध्ये तासनतास गुरफटलेली आहे. शिक्षणासाठी मागे लागणे योग्य आहे कारण मुलांच्या भविष्याचा विचार करतात. कारण सध्याची परिस्थिती लक्षात घेता शिक्षण असून नोकरी मिळत नाही. आपल्या हयातीत चांगली नोकरी व आपल्या पाल्यांचे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत लग्न व आमच्यासमोर नातवंड झाली तर आई वडिलांना विरंगुळा वाटतो. सध्या मुले आपल्या प्रकृतीची काळजी घेत नाहीत सतत कामात गुंतलेले असतात त्यांचा आग्रह शाकाहारी खाण्यासाठी असतो. हल्लीच्या मुलांना रेडीमेड नाॅनव्हेज खाण्याची सवय जडलेली असते. कारण मुलगा आणि सून कामावरून येताना थकून भागून येतात आणि रेडीमेड खाणे मागवले जाते. मुले आणि मुली वय वाढत जातात त्यामुळे लग्नाची समस्या निर्माण होते. म्हणून आई वडील लग्न करण्यासाठी मागे लागतात. वरील गोष्टी मुळे आई वडील त्रासदायक ठरत असतील तर चुकीचे आहे.
-अरुण पराडकर डोंबिवली

मुलांच्या आयुष्यावर क्रिकेटचा विकृत ताण
पांढरपेशी लोक श्रीमंत असल्यामुळे अमाप पैसा देऊन मुलांना खूप शिक्षण देऊन उच्च पदाच्या नोकऱ्या – व्यवसाय मिळवून देतात. मध्यमवर्गीय लोक सुद्धा या स्पर्धेत मागे नाहीत. पण आजकाल पालकांमध्ये एक विचित्र विकृती आली आहे ती म्हणजे आपला मुलगा क्रिकेट खेळात मोठा खेळाडू व्हावा संपूर्ण जग फिरावा भरपूर नाव व पैसा कमवावा.
आईवडील नोकरी करीत असल्यामुळे आजकल मुले जन्माला येण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. मुले एका वर्षात रांगू लागली की त्यांची पाळणाघरात रवानगी करतात. तीन वर्ष नाही होत तोपर्यंत त्या मुलांना शाळेत टाकतात. तेसुद्धा स्वतःची मातृभाषा बोलायच्या आधी जबरदस्तीने इंग्लिश शाळेत प्रवेश देतात. एकच मूल त्यामुळे खायला मागेल ते आणि भरपूर देऊन मुले एवढी जाडजूड होतात की त्यांना धावणे पळने अशक्य होते. त्यात पालकांनी दिलेला स्मार्टफोन त्यामुळे मैदानी खेळ म्हणजे काय हे त्या मुलांना दहा बारा वर्षाची होईपर्यंत माहित नसते. मुले पाचवी सहावीत जाऊ लागतात. तेव्हा त्यांचे महागडे ट्युशन क्लास चालू होतात.
एकुलता एक मुलगा आहे म्हणजे तो सर्वांना टीव्हीवर दिसला पाहिजे देशाचा हिरो झाला पाहिजे. हे एक विकृत स्वप्न पालकांना दिसते म्हणून पालक मुलांना क्रिकेट शिकायला पाठवतात. सकाळी पाच वाजता उठवून बॅट, बॉल आणि क्रिकेटचे सर्व सामान असलेली किटबॅग त्या मुलांना उचलता येणार नाही तरीही त्याना जिथे मैदान असेल तिथे जबरदस्तीने पाठवतात. आपला मुलगा सचिन, गावास्कर कपिल देव या खेळाडूंसारखा होईल. पण ते दिवस गेले आता तुमचा मुलगा खेळात कितीही वाकबगार असुदे. संपूर्ण देशातून जागतिक सामन्यासाठी फक्त जे पंधरा वीस जण खेळाडू निवडतात त्यात तुमचा मुलगा उंच व दिसायला देखणा असेल तरच तो त्या टीममध्ये घेतातmकारण क्रिकेटरला टीव्हीवर जाहिरातीत वापरायचे असते. बी सी सी आय ला जबरदस्त डोनेशन दयावे लागते कारण हल्ली गल्लोगल्ली क्रिकेटवीर तयार होत आहेत . शरीराने कमजोर म्हणून खेळाचे टेन्शन.क्रिकेट सामना हरलो तर बदनामीचे टेन्शन,शाळेची वेळ क्लासची वेळ ते टेन्शन परीक्षेत जास्तीत जास्त मार्क मिळाले पाहिजे ते टेंशन,आईवडील ओरडतील, बाईक घेऊन देतो म्हणालेत ती मिळणार नाही.अशा अनेक तनावाणे शाळेतील मुले आज चिंताग्रस्त झाली आहेत. याला मुलांवर अनेक बंधनं टाकणारे पालकच जबाबदार आहेत. समजा आपला देश पाच वर्ष क्रिकेट खेळलाच नाही तर काय होईल ? काही फरक पडणार नाही.पालकांनी मुलांना शाळेत विज्ञान,शेतीविषयक, आध्यात्मिक, कला आणि जे आवडतील ते इतर विषय मुलांना दयावे . पूर्वीचा क्रिकेट आता राहिला नाही.उदया कोणता देश क्रिकेटमध्ये जिंकणार ते आदल्या दिवशी बेटिंग लावून ठरवले जाते.म्हणून मुलांना या क्रिकेट या विकृतीतून बाजूला करावे.
-सतीश साटम
(नालासोपारा पूर्व)

‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने ‘नवाकाळ’ने केवळ प्रेमाचा उत्सव साजरा न करता, नात्यांमधील हरवत चाललेला संवाद आणि कौटुंबिक जिव्हाळा यावर प्रकाश टाकणारा एक विशेष उपक्रम हाती घेतला होता. विचारलेल्या प्रश्नावर आम्ही वाचकांकडून त्यांच्या भावना आणि मते मागवली होती. या आवाहनाला समाजातील सर्व स्तरांमधून, विशेषतः तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांकडून जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल आम्ही सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपल्या प्रतिक्रिया केवळ शब्द नसून, त्या आजच्या बदलत्या सामाजिक वास्तवाचे आरसे आहेत.










