Navale Bridge Accident : पुण्यातील नवले पूल परिसरात सातत्याने अपघात होत आहेत. सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या मालिकेचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उपस्थित केला. मागील महिन्यात 13 नोव्हेंबर रोजी झालेल्या कंटेनर अपघातात 7 ते 8 जणांचा मृत्यू झाला होता आणि 20 हून अधिक जण जखमी झाले होते.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि भूपृष्ठ विकास मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला की, ‘अपघात शून्य’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी नऱ्हे भागातील राष्ट्रीय महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार?
सुप्रिया सुळेंची आग्रही मागणी
खासदार सुळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधून घेतले की, कोल्हापूर ते पुणे या राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे परिसरात अपघातांचे प्रमाण दिल्लीतून पथक पाठवल्यानंतर कमी झाले असले तरी, ते थांबलेले नाही. त्यांनी आठवण करून दिली की, या कामात विलंब झाल्यामुळे काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले होते, त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. नवले पूल आणि अपघात हे समीकरण बनले असून, प्रवाशांना या मार्गावरून जाताना भीती वाटते, असे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर ते पुणे दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम पुर्ण होण्यास उशीर झाला आहे. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे. यासह पुण्यातील नवले पूल परिसरातील अपघात शून्यावर आणण्यासाठी उपाययोजना करावी याबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला. याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल असे आश्वासन केंद्रीय… pic.twitter.com/66cND8tL4K
— Supriya Sule (@supriya_sule) December 4, 2025
नितीन गडकरी यांचे सविस्तर उत्तर आणि उपाययोजना
सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-कोल्हापूर महामार्ग प्रकल्पाबद्दल मंत्रालयाच्या आगामी कामांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे ते सातारा या महत्त्वाच्या रस्त्यासाठी रिलायन्ससोबतचा करार थांबवण्यात आला असून, त्यासाठी अभ्यास समिती नेमण्यात आली आहे.
मंत्रालयाने या भागातील कामासाठी ₹6000 कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला (DPR) मंजुरी दिली असून, विभाग लवकरच या कामाला सुरुवात करेल. याशिवाय, पुण्यातील वेस्टर्न बायपासवरही काम सुरू आहे. वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी खंबाटकी घाटातील बोगदे लवकरच खुले केले जातील. सातारा ते कोल्हापूर या रस्त्याचे कामही सुरू आहे, पण त्यात काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अडचणींवर पुढील आठवड्यात आढावा बैठक घेऊन तोडगा काढला जाईल.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार सुळे आणि सभागृहाला आश्वासन दिले की, हा संपूर्ण प्रकल्प एक वर्षाच्या आत पूर्ण केला जाईल. त्यांनी या संदर्भात कोल्हापूरच्या लोकसभा सदस्यांनी आणि इतरांनी केलेल्या सर्व सूचनांचा स्वीकार केल्याचेही स्पष्ट केले.
हे देखील वाचा – Putin India Visit : राजशिष्टाचार बाजूला ठेवत पंतप्रधान मोदींनी केले पुतिनचे स्वागत; मुंबई पासिंगच्या ‘त्या’ खास गाडीची चर्चा









